Madhya Pradesh Wife Kills Husband: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये वृद्ध पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहून संतापलेल्या महिलेने आपल्या मुलासह त्याला बेदम मारहाण केली. या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला. यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी मृताच्या पत्नीला आणि मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नंदकिशोर (वय, ६१) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नंदकिशोर हा पत्नी द्रौपदी आणि एक मुलगा आणि सून यांच्यासोबत उज्जैनमधील पनवासा पोलीस स्टेशन हद्दीतील रामदेव मंदिराजवळ वास्तव्यास होता. नंदकिशोर स्वतःचा ट्रक चालवत असून त्याला दारूचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो घरच्यांना त्रास देत असे. चार दिवसांपूर्वीच त्याने दारूच्या नशेत आपल्या सुनेला मारहाण केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी मध्यस्तीकरत भांडण मिटवले.
नंदकिशोर एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. दरम्यान, सोमवारी रात्री द्रौपदीने नंदकिशोरला संबंधित महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. नंदकिशोर आणि त्याचे पत्नीचे भांडण झाल्याची माहिती मिळताच त्याची बहिण ममताने भावाच्या घरी धाव घेतली. त्यावेळी नंदरकिशोर पडला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्याच्या बहिणीला सांगण्यात आले. ममता रुग्णालयात पोहोचल्यानंतर नंदकिशोरचा मृत्यू झाल्याची तिला समजले. नंदकिशोरची बायको आणि मुलाने मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा ममताने संशय व्यक्त केला.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जितेंद्र शर्मा यांनी सांगितले की, "नंदकिशोरच्या डोक्यावर व पाठीवर जखमेच्या खुणा आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी वॉर्डात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पानवासा पोलीस ठाण्यात देण्यात आली."