चार मुलांना जन्माला घाला अन् एक लाखाचे बक्षीस मिळवा; ब्राह्मण समाजासाठी मंत्रिमहोदयांची घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चार मुलांना जन्माला घाला अन् एक लाखाचे बक्षीस मिळवा; ब्राह्मण समाजासाठी मंत्रिमहोदयांची घोषणा

चार मुलांना जन्माला घाला अन् एक लाखाचे बक्षीस मिळवा; ब्राह्मण समाजासाठी मंत्रिमहोदयांची घोषणा

Jan 13, 2025 06:21 PM IST

मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण मंडळाच्या अध्यक्षांनी एक विचित्र आवाहन केले आहे. ब्राह्मण दाम्पत्यांना चार मुले झाल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मंडळाच्या अध्यक्षाला मध्यप्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध कार्यक्रम राबवत आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांना कुटूंब नियोजनासाठी प्रोत्साहित करत आहे. लोकसंख्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देत असतानाच मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेल्या मंडळाच्या अध्यक्षांनी  लोकसंख्या वाढवणाऱ्यांसाठी पुरस्कार जाहीर केला आहे.

मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी एक विचित्र आवाहन केले आहे. चार मुले जन्माला घालण्याचा निर्णय घेणाऱ्या तरुण ब्राह्मण जोडप्यांना त्यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. राजोरिया यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे.

भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना राजोरिया म्हणाले की, देशात धर्मांधांची संख्या वाढत आहे कारण आम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंब वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे बंद केले आहे. तरुणांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण वृद्ध लोकांकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही. भावी पिढ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. आजची तरुणाई सेटल होऊन एक मूल जन्माला घालतात व कुटूंब वाढवण्याचे बंद करतात. हे अत्यंत चिंताजनक आहे.

'तुम्हाला किमान चार मुलं असावीत, असा माझा आग्रह आहे. त्यानंतर त्यांनी चार मुले असलेल्या जोडप्यांना परशुराम मंडळ एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले. ते मंडळाचे अध्यक्ष राहतील किंवा नसतील, हा पुरस्कार दिला जाईल, असे ते म्हणाले.

राजोरिया म्हणाले की, आता शिक्षण खूप महाग झाले आहे, असे तरुण वारंवार सांगतात. याबाबत ते म्हणाले की, तुम्ही कसेही रहात असाल तरी मुले होण्यात मागे राहू नका. तसे न केल्यास धर्मद्रोही या देशाचा ताबा घेतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर