Madhya Pradesh: मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूर जिल्ह्यात सहलीसाठी गेलेल्या लष्करातील अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मैत्रिणीवर हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यानंतर नराधमांनी बंदूकीचा धाक दाखवून त्यांच्यातील एका महिलेवर बलात्कार करण्यात आला, अशी माहिती प्रसारमाध्यमांत झळकत होती. पंरतु, संबंधित महिलेने शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झालाच नाही, अशी पोलिसांना माहिती दिली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पैसे लुटल्याची घटना खरी असल्याचे महिलेने सांगितले आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रुपेश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महू आर्मी कॉलेजमधील दोन प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकारी आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेले असताना आठ जणांनी त्यांची कार घेरले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पैसे लुटले. दोन पैकी एका महिलेने बुधवारी रात्री उशिरा शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितले. हल्लेखोरांनी तिला मारहाण करण्यात आली, पण बलात्कार झाला नाही.
एका प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ७० (सामूहिक बलात्कार), ३१०-२ (दरोडा), ३०७-२ (खंडणी) आणि ११५-२ (स्वेच्छेने इजा पोहोचविणे) आणि आरोपींनी अवैध शस्त्रे बाळगल्याने शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे उपमहानिरीक्षक निमिष अग्रवाल यांनी सांगितले. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा जणांना पकडण्यासाठी १० पथके तयार करण्यात आली आहेत.
हल्लेखोरांनी प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकारी आणि महिलांना मारहाण केली आणि त्यांचे पैसे लुटले, असे अग्रवाल यांनी सांगितले. हल्लेखोरांनी एका अधिकाऱ्याला आणि त्याच्या एका महिला मित्राला बंधक बनवले आणि दुसऱ्या महिलेला आणि अधिकाऱ्याला १० लाख रुपये घेण्यासाठी पाठवले. अधिकाऱ्याने आपल्या युनिटमध्ये धाव घेतली आणि कमांडिंग ऑफिसरला माहिती दिली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
काही दिवसांपूर्वी पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर हल्लेखोरांनी एका तरुणाला अडवून त्याच्याजवळील तीन लाखांची रोकड पळवली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिंटुकुमार विजय सिंह, असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. सिंटुकुमार हा मूळचा बिहारचा असून सध्या शिरुर परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचा विवाह ठरला होता. तो रेल्वेने गावी जाणार होता. मात्र, त्याचे रेल्वे प्रवासाचे तिकिट निश्चित झाले नव्हते. रेल्वे स्थानकावर दोघांनी त्याला गाठले. आरक्षित तिकिट देण्याचे आमिष त्याला दाखविले. त्यानंतर दोघांनी त्याला रिक्षातून गणेश पेठ परिसरात नेले. त्यानंतर त्याला मारहाण करत त्याच्याजवळील पैसे लुटले.