उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या तणावातून मृत्यू झाल्यानंतर अशाच प्रकारची घटना मंगळवारी लखनऊमध्ये घडली आहे. येथील एचडीएफसी बँकेच्या एका महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. तिच्या सहकाऱ्यांनी कामाच्या ताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
एचडीएफसीच्या विभूतीखंड शाखेत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचा खुर्चीवरून पडून मृत्यू झाला आहे. सदफ फातिमा (वय ४५) असे मृत्यू झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्या बँकेत अतिरिक्त उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
सदफ फातिमा एचडीएफसी बँकेच्या गोमती नगर येथील विभुती खंड शाखेत अतिरिक्त उपाध्यक्ष पदावर कार्यरत होता. फातिमा यांचा मृत्यू बँकेत खुर्चीवरून पडून झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, सरकारी नोकऱ्यांपासून खासगी नोकऱ्यांपर्यंत सर्वत्र कामाचा ताण आणि चिंता वाढली आहे. लोकांवर कामाची सक्ती केली जात आहे.
नोकरदारांची अवस्था रोजंदारी मजुरांपेक्षाही वाईट झाली आहे, कारण त्यांना बोलण्याचाही अधिकार नाही. सरकार समस्या सोडवण्यासाठी आहे, निराधार सूचना देण्यासाठी नाही, अशी टीका अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
कामाच्या दडपणाखाली असलेल्या तरुणांना तणाव 'मॅनेजमेंट'चे धडे देण्याची गरज आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच केलेल्या सूचनेवर सपा प्रमुखांनी निशाणा साधला.
कामाची परिस्थिती सुधारण्याऐवजी देशातील तरुणांना दबाव सहन करण्याची ताकद विकसित करण्याचे व्याख्यान देणारी भाजप मंत्री या दु:खाच्या वातावरणात तरुणांना आणखी त्रास देत आहेत. जर त्यांचे सरकार काही दिलासा देऊ शकत नसेल, सुधारणा करू शकत नसेल तर कमीत कमी हृदयहीन आणि असंवेदनशील सल्ल्याने जनतेचा संताप वाढवू नये.
अॅना सेबॅस्टियन पेरायल नावाच्या महिला कर्मचाऱ्याने २०२३ मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर तिने पुण्यातील ईवाय ग्लोबलची सदस्य कंपनी एस. आर. बाटलीबोई येथे ऑडिट टीमचा भाग म्हणून काम सुरू केले. ईवाय इंडियामध्ये ती चार महिन्यांपासून कामाला होती. तिचा अचानक झालेला मृत्यू कामाच्या अतिताणामुळे झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.
अॅनाच्या आईने आपल्या पत्रात दावा केला आहे की, ही माझ्या मुलीची पहिली नोकरी होती आणि ती कंपनीत रुजू होण्यास उत्सुक होती. मात्र, अवघ्या चार महिन्यांतच कामाच्या अतिताणामुळे तिचा मृत्यू झाला. तिने रात्री उशिरापर्यंत काम केले आणि आठवड्याच्या शेवटी बहुतेक दिवस पूर्णपणे थकून आपल्या पीजी निवासस्थानी परतली. तिच्यावर कामाचा ताण होता. असा दावा या पत्रात करण्यात आला असून, तिच्या अंत्ययात्रेला कंपनीतील कोणीही उपस्थित नव्हते.