LPG prices 1 januray 2024 : नवीन वर्षाच्या सुरवातीला LPG सिलेंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षांचे गिफ्ट देण्यात आले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. आज १ जानेवारी २०२४ पासून एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. आज व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
२०२४ मध्ये म्हणजे या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचे वर्ष असल्याने हे दर मोठ्या प्रमाणात कमी होणार अशी अपेक्षा होती. कारण २०१९ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली होती. १४ किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत तब्बल १२०.५० रुपयांनी कमी झाली होती. दिल्लीत सिलिंडर ८०९.५० रुपयांवरून ६८९ रुपयांवर आला होता. मात्र, यावर्षी तसे झाले नाही.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात आज झालेली कपात ही नवीन वर्षाची भेट आहे. आज दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ही १७५५.५० रुपये इतकी झाली आहे. पूर्वी ही किंमत १७५७ रुपये होती. ही सिलेंडर १.५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे कलकत्ता येथे या सिलिंडरची किंमत १८६९ रुपये झाली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये १८६८.५० रुपये एवढी किंमत होती. मुंबईत १७१० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७०८.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये १९२९ ऐवजी १९२४.५० व्यावसायिक सिलेंडर विकले जाणार आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना मात्र, कोणताही दिलासा देण्यात आला नाही. ३० ऑगस्ट २०२३ च्या दराने ही सिलेंडर विकल्या जात आहेत. सध्या हा सिलिंडर दिल्लीत ९०३ रुपयांना विकल्या जात आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सिलिंडरच्या दरांमध्ये शेवटची मोठी कपात २० ऑगस्ट २०२३ रोजी झाली होती. हा सिलेंडर ११०३ रुपयांवरून ९०३ रुपयांवर म्हणजे तब्बल २०० रुपयांनी स्वस्त झाला होता. आज घरगुती सिलिंडरची किंमत कोलकात्यात ९२९रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये आहे.