रक्षाबंधनच्या आधीच मध्य प्रदेश सरकारने 'लाडक्या बहिणींना' मोठी भेट दिली आहे. 'लाडली बहना' योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ४५० रुपये दराने गॅस सिलिंडर मिळणार आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये गॅस सिलिंडरचा दर ८४८ रुपये आहे. आता महिलांना निम्मी किंमतीवर गॅस उपलब्ध होणार आहे. प्रति सिलिंडर ३९९ रुपयांचे अनुदान सरकार देणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नागरी विकास व आवास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी कॅबिनेट बैठकीनंतर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'लाडली बहना योजनेच्या लाभार्थी महिलांना ४५० रुपयात गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल. गॅसची टाकी सध्या ८४८ रुपयात मिळत आहे. त्यामुसार ४५० रुपये संबंधित लाभार्थ्यांना द्यावे लागतील तर ३९९ रुपये सरकार देणार आहे. यासाठी सरकार १६० कोटी रुपये खर्च करणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १२५० रुपये जमा होत असतात. या महिन्यात रक्षाबंधन असल्यामुळे सरकार २५० रुपये अधिक देणार आहे. ही रक्कम १ ऑगस्ट रोजी वितरीत केली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजना सुरू केली होती. २०२३ च्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विक्रमी विजयात या योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
अंगणवाडी सेविकांना विमा कव्हर -
अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सक्षम अंगणवाडी पोषण योजनेच्या माध्यमातून अंगणवाडीतील सर्व भगिनींना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचे कव्हर दिले जाईल. याचे प्रीमियम राज्य सरकार भरणार आहे. राज्यातील ५७ हजार ३२४ अंगणवाडी सेविका महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
शहरांना जोडले जाणार गाव -
विजयवर्गीय यांनी सांगितले की, मध्यप्रदेश रूरल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत गावांना शहरांशी जोडण्यासाठी जितके काही अर्धवट अवस्थेतील प्रकल्प आहेत. ते पूर्ण केले जातील. यासाठी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जितकी निधी मिळेल, त्यात राज्य सरकारही योगदान देऊन अपूर्ण कामे पूर्ण करून घेतले जाणार आहेत.
संबंधित बातम्या