जर एखाद्या पुरुषाची पत्नी परपुरुषावर प्रेम करत असेल तर तो व्यभिचार मानता येणार नाही. जोपर्यंत ती दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही तोपर्यंत त्याला व्यभिचार म्हणता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती जी. एस. अहलुवालिया म्हणाले की, व्यभिचार तेव्हाच होतो जेव्हा शारीरिक संबंध असतात. पतीने कोर्टात दावा केला होता की, त्याची पत्नी दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आहे. अशा परिस्थितीत तिला पोटगी चा अधिकार नाही.
भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम १४४ (५) आणि सीआरपीसीच्या कलम १२५ (४) नुसार पत्नीवरील व्यभिचाराचे आरोप खरे सिद्ध झाले तरच तिला पोटगीपासून वंचित ठेवता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, व्यभिचार सिद्ध करण्यासाठी शारीरिक संबंध सिद्ध करणे आवश्यक आहे. पत्नी जर कुणावर प्रेम करत असेल आणि शारीरिक संबंध ठेवत नसेल तर त्याला व्यभिचाराच्या श्रेणीत ठेवता येणार नाही.
कौटुंबिक न्यायालयाने पतीला दरमहा चार हजार रुपये पोटगी द्यावी लागेल, असा निकाल दिला होता. पती वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता आणि महिन्याला आठ हजार रुपये कमावत होता. पत्नीचे दुसऱ्या कोणावर प्रेम असल्याचा दावा करत पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कलम २४ अन्वये आदेश दिल्यानंतर पत्नीला आधीच चार हजार रुपये पोटगी मिळत होती. रुग्णालयाने दिलेल्या वेतन प्रमाणपत्राची पडताळणी झालेली नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने म्हटले की, वेतन प्रमाणपत्रावर जारी केल्याची जागा व तारीख देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत हे प्रमाणपत्र योग्य आहे की खोटे हे ठरवणे कोर्टाला अवघड आहे. आपण सक्षम व्यक्ती नसल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला होता. पोटगी न देण्यामागे कमी उत्पन्न हा आधार असू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. आपल्या दैनंदिन गरजाही आपण भागवू शकत नाही, हे जर नवऱ्याला माहीत असेल तर त्याला तो स्वत: जबाबदार होता. पत्नीची जबाबदारी पेलण्यासाठी त्याने कमाई करायला हवी होती. पत्नी ब्युटी पार्लर चालवते, असा दावाही पतीने केला होता. पतीला दरमहा चार हजार रुपये पत्नीला पोटगी म्हणून द्यावेच लागतील, असे कोर्टाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या