Viral News : जगातील अनेक देशांचा जन्मदर झपाट्याने कमी होत आहे. यात दक्षिण कोरिया, जपानसह चीनचा देखील क्रमांक लागतो. प्रजनन दर कमी झाल्याने हे देश चिंतित आहेत. चीनमध्ये सध्या एक मूल धोरण असून यामुळे देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर चीनने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता याचे विपरीत परिणाम देशात जानवत आहेत. चीन देशातील जन्मदर वाढवण्यासाठी आता शाळा, महविद्यालयात मुलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. चीन सरकारचं हे पाऊल सोशल मिडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चीनमध्ये लग्न आणि नातेसंबंधांबद्दल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिमा आहे. त्यामुळे चीनमधील तरुण तरुणी एकत्र येऊन लग्न करण्यास टाळाटाळ करत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी चीनमध्ये तरुणांमध्ये विवाह आणि नातेसंबंधांबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत चीनने विद्यापीठात व शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रेमाचे धडे शिकवण्याचे निर्देश दिले आहेत.
चायना पॉप्युलेशन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कॉलेज आणि विद्यापीठांनी विवाह आणि प्रेम शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी आदेश दिले आहेत. या अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लग्नाची आवड निर्माण केली जाणार आहे. चायना पॉप्युलेशन न्यूजने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ५७ टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नातेसंबंध ठेवण्यास स्वारस्य नाही. त्यामुळे अभ्यास आणि रोमान्स यांचा समतोल साधण्यासाठी कॉलेजमध्ये आता प्रेमसंबंधाचे धडे दिले जाणार आहे.
प्रेम आणि विवाह याविषयी पद्धतशीर आणि शास्त्रीय शिक्षणाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये भावनिक संबंधांची समज कमी होत असल्याचे काही सर्वेक्षणातून निदर्शनास आले होते. लोकसंख्येचा कल, विवाह आणि अपत्यप्राप्तीच्या आधुनिक संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यावर विद्यापीठांनी भर द्यावा, असे या अहवालात सुचविण्यात आले होते. १.४ अब्ज लोकसंख्या असलेला चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या सोबतच चीन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. कमी लोकसंख्येमुळे भविष्यात सरकारी खर्च वाढेल आणि अर्थव्यवस्थेवर ताण येईल. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी येत्या काळात प्रजनन दर वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकत असल्याने त्यांना हे शिक्षण कॉलेजमध्ये दिले जाणार आहे.
संबंधित बातम्या