बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारानंतर तेथील हिंदूंची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचे हंगामी सरकार मोहम्मद युनूस यांना हिंदूंची सुरक्षा निश्चित करण्याची विनंती केली होती. आता बातमी समोर आली आहे की, बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपात दुर्गापूजेच्या वेळी वापरली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेश सरकारच्या या आदेशाला आता विरोध होत आहे.
बांगलादेश ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशचे गृह विषयक सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी मंगळवारी आदेश जारी केला की, दुर्गापूजेच्या मंडपात वापरली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवावेत. अजानच्या पाच मिनिटे आधी म्युझिक सिस्टीम बंद करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
बांगलादेश पश्चिम बंगालच्या जवळ असल्याने तेथे राहणाऱ्या हिंदूंच्या मनात दुर्गामातेबद्दल अपार श्रद्धा आहे. बांगलादेशमध्ये यावर्षी ३२,६६६ पूजा मंडप उभारण्यात येणार असून यामध्ये ढाका साऊथ सिटीमध्ये १५७ आणि नॉर्थ सिटी कॉर्पोरेशनमध्ये ८८ चा समावेश आहे. गेल्या वर्षी ही संख्या ३३ हजार ४३१ होती, मात्र यंदा ही संख्या कमी झाली आहे. साहजिकच यावेळी ही कपात तेथे राहणाऱ्या हिंदूंच्या स्थितीमुळे झाली आहे.
बांगलादेशच्या या आदेशानंतर भारतात निदर्शने सुरू झाली आहेत. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी या आदेशाला विरोध केला आहे. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचे सल्लागार निर्देश देत आहेत की हिंदूंनी अजानच्या ५ मिनिटे आधी त्यांची पूजा, संगीत आणि कोणताही विधी थांबवावा - अन्यथा त्यांना अटकेला सामोरे जावे लागेल. हा नवा तालिबानी बांगलादेश आहे."
बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख युनूस यांनी १६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी युनूस यांना बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्याची विनंती केली. बांगलादेश सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला प्राधान्य देईल, असे आश्वासन युनूस यांनी दिले होते. पण अलीकडच्या काळात बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये अतिशयोक्तीपूर्ण असल्याचा आरोप युनूस यांनी केला होता.