Walmart news Marathi : वॉलमार्टच्या वेबसाइटवरील चप्पल, अंडरगारमेंट्स आणि स्विमसूट सारख्या उत्पादनांवर गणपती बाप्पाचं चित्र रेखाटलेलं आढळल्यामुळं संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडिया युजर्सनी वॉलमार्टच्या वेबसाइटवरील या संदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. गणेशभक्तांनी वॉलमार्टला धारेवर धरलं असून हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
'हे पाहा! वॉलमार्टनं अंडरविअर आणि कॅज्युअल वेअरवर श्रीगणेशाची प्रतिमा चित्रित करणं हा हिंदूंचा अपमान आहे. देव-देवता म्हणजे फॅशन मॉडेल नव्हेत. त्यांना एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व आहे. आपल्या धार्मिक प्रतिकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी कृपया अशा कंपन्यांना विसरू नका, असं फोटो शेअर करणाऱ्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हिंदू-अमेरिकनांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या हिंदू अमेरिकन फाऊंडेशन (HAF) या संघटनेनं या प्रकारावर टीका केली आहे.
"प्रिय @Walmart: कुणाच्या श्रद्धांचा अनादर करणं याला फॅशन म्हणत नाहीत. गणपती बाप्पासारख्या हिंदू देवता जगभरातील एक अब्जांहून अधिक लोकांची श्रद्धास्थानं आहेत. त्यांना एक आध्यात्मिक महत्त्व आहे. अशा पवित्र प्रतिकांना चप्पल आणि स्वीमसूटवर चित्रित करणं हा त्यांचा अवमान आहे, असं एचएएफनं म्हटलं आहे.
'आम्ही वॉलमार्टशी औपचारिकरित्या संपर्क साधून या वस्तू तात्काळ बंद करण्याची विनंती केली आहे. इतरांप्रति आदर आणि संवेदनशीलता दाखवा असं आवाहन आम्ही तुम्हाला करतो, असं एचएएफनं वॉलमार्टला उद्देशून म्हटलं आहे.
नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर वॉलमार्टच्या वेबसाइटवरून ही उत्पादनं गायब झाली आहेत. मात्र, गणेशभक्तांचा संताप कायम असून त्यांनी वॉलमार्टला इशारा दिला आहे.
'सांस्कृतिक अज्ञानामुळं असा उद्रेक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत. चप्पल, अंडरवेअर सारख्या वस्तूंवर गणपतीचं चित्रण करणं हे लाखो भाविकांचा अपमान करणारं आहे. सांस्कृतिक भावनांचा आदर करणं आवश्यक आहे हे वॉलमार्टनं समजून घ्यायला हवं, असं एका युजरनं म्हटलं आहे.
देव-देवतांसारख्या पवित्र प्रतिकांचं चित्रण चुकीच्या वस्तूंवर करणं ही सर्जनशीलता नसून मूर्खपणा आहे. संस्कृती आणि श्रद्धेचा आदर करणं हा एखादा ट्रेंड नसतो; ती किमान अपेक्षा असते. वॉलमार्टवाल्यांनो सुधारा, असं आणखी एका युजरनं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या