सध्या नवरा-बायकोतील मतभेदांमुळे घटस्फोटासारख्या घटना सर्रास घडत आहेत. पण पैशांसाठी वारंवार लग्न करून सर्वांपासून घटस्फोट घेतल्याची घटना तुम्ही क्वचितच ऐकली असेल. श्रीमंत लोकांना लग्नाचे आमिष दाखवून नंतर त्यांना हुंड्यासाठी छळ करणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध आदि गंभीर गुन्ह्यात अडकवणाऱ्या डेहराडून येथील एका महिलेला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. इतकंच नाही तर खटले निकाली काढण्यासाठी ही महिला पुरुषांकडून लाखो रुपये उकळत असे. जयपूर पोलिसांनी आरोपी महिलेला दरोडेखोर वधू म्हटले आहे.
आरोपी महिलेने अनेक पुरुषांशी लग्न करून प्रकरणे मिटवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून एकूण सव्वा कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या सीमा उर्फ निक्की हिने २०१३ मध्ये आग्रा येथील एका व्यावसायिकाशी लग्न केले होते. काही वेळानंतर निक्कीने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी तडजोड म्हणून ७५ लाख रुपये घेतले. त्याचप्रमाणे निक्कीने २०१७ मध्ये गुरुग्राममधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला आपल्या जाळ्यात ओढले.
निक्कीने गुरुग्राममधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न केले आणि नंतर त्याच्याकडून विभक्त होण्याचा करार म्हणून १० लाख रुपये घेतले. यानंतर निक्कीने २०२३ मध्ये जयपूरमधील एका उद्योगपतीला अडकवून त्याच्याशी लग्न केले. यावेळीही सीमा ऊर्फ निक्कीची नजर व्यापाऱ्याच्या संपत्तीवर होती. त्यानंतर घरातील ३६ लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन ती पसार झाली. यानंतर पीडिताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर जयपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, प्राथमिक तपासात आरोपी सीमा मॅट्रिमोनियल साइट्सवर आपले सावज शोधत असे. घटस्फोट झालेल्या किंवा पत्नीचा मृत्यू झालेल्या पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. आरोपी सीमा श्रीमंत पुरुषांशी लग्न करायची आणि नंतर हुंड्यासाठी छळ आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला दाखल करायची. त्यानंतर घटस्फोट आणि प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली पीडितांकडून लाखो रुपये उकळायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सीमा अग्रवाल हिने विविध राज्यांतील विविध प्रकरणांमध्ये सेटलमेंट म्हणून सव्वा कोटी रुपये उकळले आहेत.
संबंधित बातम्या