Exit poll हा तर मानसिक खेळ; तीन दिवसानंतर मोदींची Exit निश्चितः कॉंग्रेस नेत्याचं ट्विट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Exit poll हा तर मानसिक खेळ; तीन दिवसानंतर मोदींची Exit निश्चितः कॉंग्रेस नेत्याचं ट्विट

Exit poll हा तर मानसिक खेळ; तीन दिवसानंतर मोदींची Exit निश्चितः कॉंग्रेस नेत्याचं ट्विट

Jun 01, 2024 10:25 PM IST

एक्झिट पोलबाबत कॉंग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. एक्झिट पोल हा एक मानसिक खेळ असल्याचं वक्तव्य कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी केलं आहे.

Congress leader Jairam Ramesh on Exit Polls
Congress leader Jairam Ramesh on Exit Polls

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान आज पार पडल्यानंतर विविध टीव्ही चॅनल्सनी एक्झिट पोल (exit poll) जाहीर केले आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून भाजप प्रणित एनडीए हॅटट्रिक करून केंद्रात सत्ता राखण्यात यशस्वी होत असल्याचं दाखवण्यात येत असून कॉंग्रेस प्रणित इंडिया आघाडीचा पराभव होणार असल्याचे दाखवण्यात येत आहे. एक्झिट पोलबाबत कॉंग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. एक्झिट पोल हा एक मानसिक खेळ असल्याचं वक्तव्य कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी केलं आहे. सोशल मीडियावर रमेश यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे वास्तविक निकाल वेगळे असतील, असं रमेश यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीला २९५ हून अधिक जागा मिळणार असल्याचे रमेश यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सर्व एक्झिट पोल घडवून आणले!-रमेश

जयराम रमेश म्हणतात, ‘ज्या व्यक्तीची ४ तारखेला एक्झिट निश्चित आहे, त्यानेच हे एक्झिट पोल घडवून आणले आहेत. लोकसभेत इंडिया आघाडीला किमान २९५ जागा मिळून स्पष्ट आणि मजबूत असे बहुमत मिळणार आहे. दरम्यानच्या काळात निवर्तमान पंतप्रधान यांचा कालावधी फक्त तीन दिवसांसाठी राहिला आहे. (एक्झिट पोल) हा सारा मानसिक खेळ त्यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) रचला आहे. ४ तारखेच्या दिवशी वास्तविक निकाल हे संपूर्ण वेगळे असतील’ असं ट्विट जयराम रमेश यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधून निवडणूक निकालाबाबतचे वास्तव चित्र प्रतिबिंबीत होत नाही, असं सिंघवी यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे. यापूर्वी अनेक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचे एक्झिट पोल हे चुकीचे ठरले होते. एक्झिट पोलमध्ये दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला जेवढ्या ५-६ जागा दाखवण्यात येत आहे, ते पटण्यासारखे नाही. तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजप जास्तीत जास्त एक जागा जिंकेल, असं मला वाटतं. कर्नाटकात भाजप जास्तीत जास्त ८-९ जागा जिंकेल असं खुद्द भाजपचे नेते खाजगीत सांगत आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस फक्त एखाद सीट जिंकू शकेल, असं एक्झिट पोल दाखवत आहेत, जे पटण्यासारखे नाही. या तीन राज्यांमध्ये कॉंग्रेस २५ टक्के जागा जिंकेल असं मला वाटतं, असं सिंघवी म्हणाले. एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला दाखवलेला आकडा फुगवलेला वाटतो. सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएचा आकडा फुगवून सांगण्यात येत असल्याचं सिंघवी म्हणाले.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर