election commission guidelines explainer : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आज निवडणूक आयोग निवडणूक कार्यकम जाहीर करणार आहे. दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार असून यानंतर संपूर्ण देशात निवडणूक आचारसंहिता लागू केली जाणार आहे. या आचार संहीतेचे पालन राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. निवडणूक आयोगाचे हे नियम मोडल्यास शिक्षा देखील होऊ शकते. आचार संहिता म्हणजे काय? निवडणूक आयोगाचे नियम काय याची माहिती आपण घेऊयात.
आचार संहिता लागू झाल्यावर अनेक गोष्टी या बंद राहतात तर काही सुरू राहतात. राजकीय पक्षांना या आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे लागते. हे नियम पाळले नाही तर उमेदवारी देखील रद्द होऊ शकते. तसेच आचारसंहिता भंग केल्याने गुन्हा देखील दाखल होऊ शकतो.
आचार संहिता लागू झाल्यावर काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार हा सर्वसामान्य नागरिकांना पडणारा प्रश्न असतो. आचार संहिता लागू झाल्यावर प्रामुख्याने पेंशनची कामे, जाती प्रमाण पत्र बनवण्याची कामे, आधारकार्ड तयार करण्याची कामे, सार्वजनिक वीज पुरवठा तसेक पाण्यासंबंधी कामे, साफसफाई संबंधी कामे, वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणे, रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे, सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प, सर्वसामान्य नागरिकांच्या घराच्या आराखड्याची कामे आदि बाबी या सुरू राहणार आहेत.
तर आचारसंहिता काळात सार्वजनिक उद्घाटनाचे कार्यक्रम, भूमिपूजन बंद राहणार आहेत. तसेच नव्या कामांचा स्वीकार करता येणार नाही. सरकारी कामांचे होर्डिंग्ज, फ्लेक्स, बोर्ड लावता येणार नाही. जी बोर्ड या पूर्वी लावली असतात, ती काढावी लागतात. अथवा कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ती झाकावी देखील लागतात. मतदार संघांत राजकीय दौरे आयोजित करता येत नाही. सरकारी वाहनांना सायरन लावला जात नाही. शासकीय भवन, कार्यालयात पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो लावता येत नाही. जी लावली असेल ती काढून टाकली जातात. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर माध्यमांत सरकारी जाहिराती देता येणार नाहीत. लाच खोरांवर कठोर कारवाई. समाज माध्यमांनवर पोस्ट करताना देखील काळजी घ्यावी लागणार आहे. थोडी चूक सुद्धा जेलमध्ये पाठवू शकते. त्यामुळे पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करावा लागणार आहे. कोणत्याही नेत्याचा प्रचार करतांना आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत खर्च उमेदवारांना करावा लागतो. तसेच उमेदवारी सादर करतांना संपत्ती आणि खर्चाचा तपशील देखील जाहीर करावा लागतो.
आचारसंहितेचे पालन करतांना सर्व सामान्य नागरिकांना देखील विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य माणसानेही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. कोणत्याही नेत्याच्या प्रचार करतांना आचार संहिता नियम माहिती असणे गरजेचे असते. त्यामुळे प्रचार करतांना याचे उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर सर्व शासकीय यंत्रणा या निवडणूक आयोगाच्या ताब्यात येतात. निवडणूक संपेपर्यंत प्रत्येक सरकारी कर्मचारी निवडणूक आयोगाचा कर्मचारी होतो. निवडणूक आचारसंहिता हा निवडणूक आयोगाने तयार केलेला नियम आहे, जो प्रत्येकासाठी लागू होतो. निवडणुकीच्या काळात कोणत्याही मंत्र्याला अधिकृत दौरा निवडणुकीसाठी करता येत नाही. सरकारी संसाधनांचा वापर करता येत नाही. केंद्र तसेच कोणत्याही राज्याचे सरकार कोणतीही घोषणा करू शकत नाही, सरकारी खर्चाने कोणतेही कार्यक्रम घेता येत नाही. या सर्वांवर निवडणूक आयोगातर्फे निरीक्षकांची नेमणूक केली जाते.
राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिरवणूक काढण्यासाठी तसेच सभा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या बाबतची माहिती ही स्थानिक किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी लागेल. सभा, प्रचार दौरा किंवा बैठकीचे ठिकाण आणि त्याच्या वेळेची माहिती देखील पोलिसांना द्यावी लागते. धार्मिक तेढ पसरेल अशी कोणतीही व्यक्तव्य करता येत नाही. मतांसाठी लाच देणे, पैसे वाटणे, दारू पाजणे कायद्याने गुन्हा आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या परिघात प्रचार करण्यास बंदी असते. तर मतदानाच्या एक दिवस आधी कोणतीही सभा घेता येत नाही. या काळात सरकारी भरती देखील बंद ठेवली जाते. किंवा रद्द केली जाते.