मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Flying kiss : राहुल गांधींनी संसदेत नेमकं काय केलं?; खासदार रजनी पाटील यांनी सांगितलं!

Flying kiss : राहुल गांधींनी संसदेत नेमकं काय केलं?; खासदार रजनी पाटील यांनी सांगितलं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 10, 2023 01:16 PM IST

Rahul Gandhi Flying kiss : राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या हावभावावरून सध्या देशभरात राजकीय गदारोळ उठला आहे.

Rajani Patil on Rahul Gandhi Flying Kiss
Rajani Patil on Rahul Gandhi Flying Kiss

Rajani Patil on Flying kiss row : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपच्या महिला खासदारांकडं बघून फ्लाइंग किस दिल्याचा आरोप स्मृती ईराणी यांनी केल्यानंतर देशभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपकडून राहुल यांच्यावर टीका होत आहे, तर विरोधक भाजपवर मुद्दा भरकटवण्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी प्रेक्षक गॅलरीत असलेल्या काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना बुधवारी राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. भाजप व मोदी सरकारवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर भाजपच्या बाजूनं भाषणाला उभ्या राहिलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल यांच्यावर फ्लाइंग किसचा आरोप केला. त्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. लोकसभेत नेमकं काय घडलं यावर काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी प्रकाश टाकला आहे.

‘राहुल गांधी यांचं भाषण सुरू होणार असल्यानं मी स्वत: प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. त्यांनी जे काही केलं, त्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय. चार हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा सुरू असतानाही राहुल गांधी हे अनेक लोकांना फ्लाइंग किस देत होते. हा शिष्टाचाराचा भाग आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीकडं कसं बघता त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुमच्या मनात वाईटच असेल तर तुम्हाला वाईटच दिसणार,’ असं रजनी पाटील म्हणाल्या.

भाषणाच्या वेळी राहुल गांधी यांनी आणलेले कागद खाली पडले. त्यावेळी भाजपचे खासदार अतिशय कुत्सितपणे हसत होते. त्यांना कुठलंही उत्तर न देता राहुल यांनी वेगळ्या प्रकारे त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं. त्यामागे सद्भाव होता. मी स्वत: सगळं जवळून पाहिलं आहे. ह्याच लोकांनी गेली अनेक वर्षे राहुल गांधी यांची चेष्टा करून त्यांचं वेगळं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे, ते आता बंद केलं पाहिजे, असंही रजनी पाटील म्हणाल्या.

स्मृती ईराणी मणिपूरच्या महिलांबद्दल बोलल्या का?

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपला कुठलाही मुद्दा मिळत नसल्यानं हे सगळं सुरू आहे. हजारो महिला राहुल गांधी यांच्याकडं येतात, विश्वासानं त्यांच्या खांद्यावर विसावतात. हे भाजपच्या लोकांना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या महिला खासदारांना, विशेषत: स्मृती ईराणींना महिलांचा इतका कळवळा आहे तर मणिपूरमध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाला, त्यावर त्या का बोलल्या नाहीत? महिलांच्या विरोधातील इतर अत्याचारांवर त्या बोलत नाहीत आणि फ्लाइंग किसवर नोटीस देतात, हे चुकीचं आहे, असं रजनी पाटील म्हणाल्या.

घाणेरडी वृत्ती सोडून द्या!

दिल्लीतील निर्भयाच्या भावाला कुठलाही गाजावाजा न करता राहुल गांधी यांनी मदत केली होती. तो भाऊ आज पायलट झालाय. राहुल गांधींमुळं मी पायलट झालोय हे त्या मुलानं सांगितल्यावर देशाला कळलं. त्यामुळं काही लोकांनी आपली घाणेरडी वृत्ती सोडून दिली पाहिजे, असं रजनी पाटील यांनी सुनावलं.

WhatsApp channel

विभाग