Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी २६ जून रोजी निवडणूक, भाजप आणि मित्रपक्षात रस्सीखेच
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी २६ जून रोजी निवडणूक, भाजप आणि मित्रपक्षात रस्सीखेच

Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी २६ जून रोजी निवडणूक, भाजप आणि मित्रपक्षात रस्सीखेच

Jun 13, 2024 10:38 PM IST

Lok Sabha Speaker Election : संसदेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यामुळे लोकसभा अध्यक्षपदाचा सस्पेन्स लवकरच संपणार आहे.

२६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक
२६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक

१८ व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर सगल तिसऱ्यांदा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन २४ पासून सुरू होत आहे. आठ दिवस हे अधिवेशन चालणार आहे. अधिनेशनाच्या तिसऱ्या दिवशी २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. याबाबत लोकसभेद्वारे बुलेटिन जारी करत माहिती देण्यात आली आहे. या बुलेटिनमध्ये लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

१८ व्या लोकसभेचे अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित खासदारांचे हे पहिलेच लोकसभा अधिवेशन असेल. संसदेचे अधिवेशन बुधवारी, ३ जुलै रोजी संपणार आहे. लोकसभेतील सर्व निवडून आलेले खासदार या संसदेच्या अधिवेशनात शपथ घेतील.

नव्या सभापतींच्या नियुक्तीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणात पुढील पाच वर्षांच्या सरकारच्या संभाव्य रोडमॅपवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या अध्यक्षांची निवड सहसा नवीन खासदारांच्या पहिल्या बैठकीत केली जाते. जोपर्यंत नवीन सभापती निवडला जात नाही, तोपर्यंत बहुधा सर्वाधिक अनुभव असलेल्या खासदाराची सभागृहाच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली जाते. हंगामी अध्यक्ष लोकसभेच्या पहिल्या काही अधिवेशनांचे अध्यक्षपद भूषवतात आणि नवीन अध्यक्ष आणि उपसभापतींसाठी मतदान घेतात.

लोकसभा अध्यक्षपदासाठी अद्याप सरकारने कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, विरोधी पक्षाने एनडीएतील मित्रपक्ष जेडीयू आणि टीडीपीला आवाहन केले आहे की, त्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी जोर लावावा. त्यांनी आपले उमेदवार उभे करावेत.

'आप'ने सोमवारी सत्ताधारी एनडीएतील घटक पक्ष तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडला लोकसभा अध्यक्ष या दोन पक्षापैकी एकाचा व्हावा असे म्हटले आहे. तेच संविधान आणि लोकशाहीच्या हिताचे असेल, असे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनीही म्हटले आहे की, जर लोकसभा अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाने राखले तर एनडीएतील घटक पक्ष टीडीपी आणि जेडीयूने आपल्या खासदारांचा घोडेबाजार पाहण्यासाठी तयार राहावे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर