मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  LS speaker election : लढाई अजून संपलेली नाही! लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीनं उतरवला उमेदवार, आता काय होणार?

LS speaker election : लढाई अजून संपलेली नाही! लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीनं उतरवला उमेदवार, आता काय होणार?

Jun 25, 2024 01:18 PM IST

Lok sabha speaker election : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीनं के. सुरेश यांना रिंगणात उतरवलं आहे. एनडीएच्या ओम बिर्ला यांच्या विरोधात ते निवडणूक लढणार आहेत.

लढाई अजून संपलेली नाही! लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीनं उतरवला उमेदवार
लढाई अजून संपलेली नाही! लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीनं उतरवला उमेदवार

Lok sabha speaker election : लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला कडवी टक्कर दिल्यानंतर आता संसदेत इंडिया आघाडीनं संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. लोकसभा अध्यक्षपदावरून एकमत न झाल्यानं इंडिया आघाडीनं के. सुरेश यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांच्याशी त्यांचा सामना होईल.

लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता मतदान होणार आहे. च्या. सुरेश केरळमधील काँग्रेसचे खासदार असून ते आठव्यांदा लोकसभेत निवडून आले आहेत. आकड्यांवर नजर टाकल्यास एनडीएचं पारडं मजबूत दिसत आहे. मात्र, या निमित्तानं इंडिया आघाडीला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. विरोधकांना उपसभापतीपद देण्याची मागणी भाजपनं धुडकावल्यानं इंडिया आघाडीनं लढण्याचा पवित्रा घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 'ही' निवडणूक

भारतीय लोकशाहीच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या परिस्थितीसाठी राहुल गांधी यांनी सरकारला जबाबदार धरलं आहे. विरोधकांनी अध्यक्षपदासाठी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उपसभापतीपद विरोधकांना द्यावं, अशी आमची मागणी होती. तशी परंपराच आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले…

अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांची माहिती राहुल गांधी यांनी दिली. 'काल संध्याकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांना राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यांनी अध्यक्षांच्या निवडीसाठी पाठिंबा मागितला. उपसभापतीपद विरोधकांना दिलं तर आम्ही सभापतींना पाठिंबा देऊ, असं खर्गे म्हणाले. त्यावर राजनाथ सिंह यांनी पुन्हा फोन करून कळवतो असं सांगितलं. मात्र आजपर्यंत प्रतिसाद दिला नाही. यावरून त्यांना संवाद नको आहे हे स्पष्ट होत असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

अटी-शर्तींवर पाठिंबा आम्हाला अमान्य

मंत्री पियूष गोयल यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधक अटी घालून अध्यक्षपदाला पाठिंबा देऊ केला होता. लोकसभेच्या परंपरेत असं कधीच घडलं नव्हतं. लोकसभा अध्यक्ष किंवा उपसभापती हे कोणत्याही पक्षाचे नसून ते संपूर्ण सभागृहाचे असतात, असं गोयल म्हणाले.

एनडीएकडे ३०० खासदारांचं पाठबळ

एकट्या भाजपचे लोकसभेत २४० खासदार आहेत. याशिवाय एनडीएला जवळपास २९० खासदारांचा पाठिंबा आहे. यात टीडीपीचे १६, जेडीयूचे १२, एकनाथ शिंदे गटाचे ७ आणि चिराग पासवान यांच्या पक्षाचे ५ खासदार आहेत. अकाली दल आणि काही अपक्षांसह इतर अनेक छोट्या पक्षांचाही पाठिंबा सरकारला मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळंच सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना आपल्या ताकदीची जाणीव करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर