Rahul Gandhi : काँग्रेसला मोठा दिलासा, राहुल गांधी लोकसभेत परतले, खासदारकी रद्द करण्याचा निर्णय मागे
Rahul Gandhi Disqualification : सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर राहुल गांधींच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला होता.
Rahul Gandhi MP Waynad : सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आता लोकसभेच्या सचिवालयाने मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली असून त्यामुळं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. सूरतमधील कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळं राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळाल्याने काँग्रेस पक्षाला मोठा बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मोदी आडनावरून केलेल्या टिप्पणीमुळं गुजरातच्या सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने तातडीने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. त्यानंतर गुजरात हायकोर्टानेही सूरत कोर्टाचा निकाल कायम ठेवत राहुल गांधींना धक्का दिला होता. परंतु सुप्रीम कोर्टाने शिक्षेला स्थगिती देत राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आता कोर्टाच्या निकालाचे सर्व कागदपत्रं काँग्रेस नेत्यांनी लोकसभा सचिवालयाला सुपूर्द केले. त्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी आता राहुल गांधी यांना संसदेच्या उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. राहुल गांधींना खासदारकी बहाल होणं हा काँग्रेससाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
उद्या म्हणजेच मंगळवारी संसदेत विरोधी पक्षांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करणार आहे. याचवेळी राहुल गांधी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आल्यामुळं काँग्रेस नेत्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. खासदारकी रद्द आणि त्यानंतर बहाल करण्यात आल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.