Lok Sabha Elections Phase 6: लोकसभा निवडणूक २०२४ च्या सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यात दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात बिहार (८ जागा), हरियाणा (सर्व १० जागा), जम्मू-काश्मीर (१ जागा), झारखंड (४ जागा), दिल्ली (सर्व ७ जागा), ओडिशा (६ जागा), उत्तर प्रदेश (१४ जागा) आणि पश्चिम बंगाल (८ जागा) या राज्यांचा समावेश आहे.
२५ मे महिन्याच्या चौथ्या शनिवारी असल्याने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील बँका बंद राहतील. लोकसभा निवडणूक २०२४ च्या सहाव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर २५ मे रोजी कोणत्या भागात मतदान होणार आहे, याची यादी पाहुयात.
दिल्लीत 'आप' आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असून त्यांनी भाजपविरोधात संयुक्त उमेदवार उभे केले आहेत. 'आप' चार जागांवर तर काँग्रेसने उर्वरित तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ईशान्य दिल्लीतून भाजपचे मनोज तिवारी, नवी दिल्लीतून बांसुरी स्वराज, ईशान्य दिल्लीतून काँग्रेसचा कन्हैया कुमार, उत्तर-पश्चिम दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उदित राज आणि नवी दिल्लीतून सोमनाथ भारतीहे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सात टप्प्यात मतदान होत असून पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.