N Factor In Lok Sabha Election Results 2024 : देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचे निकाल येत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ३०० ते २९५ जागांसह आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी सध्या २३० जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
पण २०१४ आणि २०१९ च्या निवडणूक निकालांप्रमाणे, यावेळी भाजपला पूर्ण बहुमताचा जादूई आकडा गाठता आला नाही. अशा स्थितीत भाजपला मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
या आकडेवारीनंतर एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे एनडीए किंवा नरेंद्र मोदींसाठी एन फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी एन (N) फॅक्टर महत्त्वाचा बनला होता. तेव्हा विरोधी आघाडीने लक्ष न देता त्या एन फॅक्टरकडे पाठ फिरवली. आज तोच एन फॅक्टर किंगमेकर म्हणून समोर आला आहे. पण सध्या तो एनडीएच्या बाजूने आहे. हा एन फॅक्टर म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू. हे दोन्ही नेते इंडिया आघाडीचे मजबूत आधारस्तंभ होते पण इंडिया आघाडीतील ताण-तणावानंतर दोघांनीही युती सोडली आणि आपला लक्ष एनडीएकडे वळवले.
एनडीएच्या नमोसाठी हा एन फॅक्टर नितीश आणि नायडू आहे. एनडीएने नमो म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर बाजी मारली आहे आणि या चेहऱ्याच्या जोरावरच त्यांना विजयाची आशा आहे. एनडीएला २९९ जागा मिळताना दिसत असले तरी भाजप बहुमतात मागे पडल्याचे दिसत आहे.
यावेळी एनडीए आणि नमो यांना बहुमतासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. नितीश आणि नायडू यांच्या भूमिकेनुसार नमो सरकार बनले जाईल.
सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर नितीश यांच्या जेडीयूला बिहारमध्ये ४० पैकी १४ जागा आणि नायडूंच्या तेलगू देसम पक्षाला आंध्र प्रदेशात १६ जागा मिळताना दिसत आहेत.
आज एनडीएसाठी आणि नरेंद्र मोदींच्या सरकारसाठीही या जागा महत्त्वाच्या आहेत. नितीश आणि नायडू यांनी मिळविलेल्या ३० जागा वजा केल्यास NDA चा आकडा २६५ वर येतो, जो बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २७२ च्या जादुई आकड्यापेक्षा कमी आहे. हे पाहता एकेकाळी नितीश आणि नायडूंकडे पाठ फिरवणारा विरोधी पक्ष इंडिया आघाडीही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू शकतो.
अशा स्थितीत इंडिया आघाडी नितीश कुमार यांना मोठी ऑफर देऊ शकते, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये नितीश सर्वांचे आहेत अशी पोस्टर्सदेखील लावली आहेत. नितीश कुमार यांची भूमिका काय असेल हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.