मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Loksabha Election : लोकसभा निवडणुका १६ एप्रिलला होणार? व्हायरल पत्रावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

Loksabha Election : लोकसभा निवडणुका १६ एप्रिलला होणार? व्हायरल पत्रावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2024 10:49 PM IST

Elaction Commission : सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचे एक पत्र व्हायरल झाले असून त्यात १६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुका होणार असल्याचे म्हटले आहे. याचे सत्य आता समोर आले आहे.

lok sabha election
lok sabha election

देशात लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांची तारीख ठरली का? १६ एप्रिलला निवडणुका होणार आहेत का? असे प्रश्न सामान्य लोकांना पडले आहेत. कारण व्हायरल झालेल्या पत्रात १६ एप्रिल, २०२४ या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील, असं म्हटलं जातं. निवडणूक आयोगाच्या एका पत्राने खळबळ निर्माण झाली असून चर्चांना उधाण आले आहे. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर खुलासा दिला आहे. 

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यामुळे, भाजपाने याच सोहळ्यातून लोकसभेचे रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच, निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार आगामी लोकसभा निवडणुका १६ एप्रिल रोजी होणार असल्याची चर्चा सोशल माध्यमांत रंगली आहे. त्यावर, आता दिल्ली निवडणूक आयोगानेच स्पष्टीकरण दिलं आहे. 

१६ एप्रिल रोजी निवडणुका होणार असल्याचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख याचा आराखडा तयार करण्यासाठी १६ एप्रिल २०२४ ही तारीख ठरवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पत्रात सांगण्यात आलेली तारीख ही फक्त संदर्भासाठी असल्याचे सांगितलं आहे. या खुलाशाने निवडणुकीबाबत संभ्रम दूर झाला आहे.

WhatsApp channel