आज सकाळपासून लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. सध्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बहुमताच्या वर आहे. मात्र हा आकडा ३०० पार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत ४०० पारच्या घोषणा केल्या होत्या. मात्र तो पल्ला गाठणे दूर उलट भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणेही शक्य नाही. यंदा इंडिया आघाडीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरात चुरशीची लढत दिली. त्यामुळे इंडिया आघाडीचे मनोबल वाढले आहे. दरम्यान राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी ट्विटर एक्सवरून भाजपच्या निकालावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अशोल गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले की, २०२४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भोवती केंद्रित केली होती. मोदींची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार या सारख्या खोट्या घोषणा भाजप या शब्दापेक्षा अधिक प्रमाणात दिसून आणि ऐकू येत होत्या. इतकेच नव्हे तर लोकसभा उमेदवारांना टाळून सर्व निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर लढवली जात होती. निवडणुकीत महागाई, बरोजगारी हे प्रश्न गौण झाले आणि केवळ मोदी मोदी हेच ऐकू येत होते.
पंतप्रधानांनी आपल्या नेतृत्त्वात ३७० आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ४०० जागा पार होतील, असा दावा केला होता. मात्र आता असे होणार नाही,हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर भाजपला स्पष्ट बहुमत देखील मिळत नाहीये. असे असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची दावेदारी सोडायला हवी, असा टोला अशोक गहलोत यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदी यांना लगावला.
लोकसभा निवडणुकीचे निकाल सकाळपासून जाहीर होत आहेत. भाजपसाठी हे या निकालाचे आकडे २०१४ व २०१९ च्या निकालाहून अगदी वेगळे आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडाले होते. मात्र या निवडणुकीत इंडिया आघाडीने भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चुरशीची लढत दिली आहे. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी ते ३०० च्या खाली आहे. तर इंडिया आघाडीने सव्वा दोनशेच्या वर जागा मिळवल्या आहेत.
संबंधित बातम्या