Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मंगळवारी (४ जून) काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आज जाहीर झालेला निवडणूक निकाल हा जनतेचा निकाल आहे. हा जनतेचा विजय आहे. ही लढत मोदी विरुद्ध जनता अशी आहे.
खरगे पुढे म्हणाले की, १८व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. हा जनादेश पीएम मोदींच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मोदींचा नैतिक पराभव आहे. आमची बॅंक खाती गोठवली गेली. सरकारी यंत्रणांनी प्रत्येक टप्प्यावर अडथळे निर्माण केले. हा लोकशाहीचा विजय आहे'.
यानंतर पत्रकारांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणुक काँग्रेस आणि इंडिया (INDIA) आघाडीने केवळ एका राजकीय पक्षासाठी लढली नाही. आम्ही सकार आणि सरकारी यंत्रणांच्या विरोधात निवडणूक लढवली. या संस्थांना मोदी सरकारने धमकावले आहे. ही निवडणूक ईडी, सीबीआय विरुद्ध होती. हा लढा संविधान वाचवण्यासाठी होता.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “जेव्हा मोदींनी आमची बँक खाती गोठवली आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले, तेव्हा मला विश्वास होता की, आमच्या देशाचे लोक संविधान वाचवण्यासाठी मतदान करतील. आम्ही देशाला नवे व्हिजन दिले आहे.'
पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी त्यांना विचारले की, I.N.D.I. आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा तुमचा काय विचार आहे? यावर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही आमच्या आघाडीच्या नेत्यांशी बोलून या मुद्द्यावर निर्णय घेऊ.
या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील चांगल्या कामगिरीवर राहुल गांधी म्हणाले की, हा माझ्या बहिणीच्या मेहनतीचा विजय आहे, जी माझ्या मागे लपली आहे'.
संबंधित बातम्या