मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Annie raja news : डाव्यांचं धक्कातंत्र! राहुल गांधी यांच्या मतदारसंघात दिला तगडा उमेदवार, आता काँग्रेस काय करणार?

Annie raja news : डाव्यांचं धक्कातंत्र! राहुल गांधी यांच्या मतदारसंघात दिला तगडा उमेदवार, आता काँग्रेस काय करणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 26, 2024 09:41 PM IST

Rahul Gandhi Vs Annie Raja : इंडिया आघाडीतील घटक पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. भाकपनं वायनाड लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करत थेट राहुल गांधींना आव्हान दिलं आहे.

Rahul Gandhi vs Annie Raja
Rahul Gandhi vs Annie Raja

Congress vs CPI in Wayanad : भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपवर तोफा डागत सुटलेले व दुसरीकडं विविध राज्यांत प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या डाव्या पक्षांनी केरळमध्ये राहुल गांधी यांच्या मतदारसंघात उमेदवाराचं नाव घोषित केलं आहे.

केरळमधील वायनाड हा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे अमेठी बरोबरच वायनाडमधून लढले होते. अमेठीतून पराभवाचा सामना करावा लागलेल्या राहुल यांनी वायनाड इथं मात्र ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकानं विजय मिळवला होता. डावे पक्ष केंद्रातील मोदी सरकारविरोधात 'इंडिया' आघाडीत असल्यानं राहुल यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत अशी अपेक्षा होती. मात्र, भाकपनं इथं उमेदवार दिला आहे.

भाकप हा केरळमधील सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या पक्षानं चार महत्त्वाच्या जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात वायनाडचाही समावेश आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अ‍ॅनी राजा वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. अ‍ॅनी राजा या भाकपच्या महिला शाखेच्या सचिव असून पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी आहेत. त्यांची उमेदवारी हा राहुल गांधी व काँग्रेस यांना गंभीर इशारा मानला जात आहे.

शशी थरूर यांच्यापुढंही आव्हान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघातून भाकपनं ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पन्नियन रवींद्रन यांची उमेदवारी घोषित केली आहे. भाकपचे प्रदेश सचिव बिनॉय विश्वम यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. माजी कृषिमंत्री व्ही. एस. सुनील कुमार आणि एआयवायएफचे नेते सी. ए. अरुणकुमार हे अनुक्रमे त्रिशूर आणि मावेलिक्कारा मतदारसंघातून लढणार आहेत.

राहुल गांधी मतदारसंघ बदलणार?

भारतीय कम्युनिस्ट पक्षानं वायनाड मतदारसंघात उमेदवार दिल्याचं वृत्त येताच राहुल गांधी हे मतदारसंघ बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राहुल हे कर्नाटक किंवा तेलंगणमधून एक जागा लढतील व उत्तर प्रदेशातून एका जागेवर निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. काँग्रेस पक्षानं अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी एकही उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळं वायनाडबद्दल काय निर्णय घेतला जाणार याकडंही लक्ष लागलं आहे. वायनाडमध्ये उमेदवार घोषित करणं हे डाव्यांचं दबावतंत्र आहे की काय? काँग्रेसशी चर्चेनंतर ही उमेदवारी मागे घेतली जाणार की कसे,' याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

IPL_Entry_Point