Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या वादातून चालकांनी फाडले एकमेकांचे कपडे, ट्रेनच्या काचा फोडल्या-loco pilots of vande bharat express train fights with each other to drive train from agra to udaipur ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या वादातून चालकांनी फाडले एकमेकांचे कपडे, ट्रेनच्या काचा फोडल्या

Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या वादातून चालकांनी फाडले एकमेकांचे कपडे, ट्रेनच्या काचा फोडल्या

Sep 06, 2024 03:18 PM IST

वंदे भारत ट्रेनचं सारथ्य करण्यावरून ट्रेनचे चालक आपसात भिडल्याची घटना राजस्थानातील कोटा येथे नुकतीच घडली आहे.

वंदे भारतच्या सारथ्यावरून रेल्वे कर्मचाऱ्यांनी भिडले
वंदे भारतच्या सारथ्यावरून रेल्वे कर्मचाऱ्यांनी भिडले

देशभरात ‘वंदे भारत ट्रेन’चे रेल्वे प्रवाशांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. जलद धावणारी आणि अतिशय आरामदायक अशा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन (Vande Bharat Express) ने प्रवास करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या ट्रेनचं सारथ्य करण्यावरून ट्रेनचे चालक आपसात भिडल्याची घटना राजस्थानातील कोटा येथे नुकतीच घडली आहे. प्रकरण एवढे वाढले की रेल्वे चालक आणि सहचालकांनी एकमेकांचे कपडे फाडले आणि ट्रेनच्या काचाही फोडल्या. राजस्थानातील उदयपूर ते उत्तर प्रदेशाती आग्रा या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचं उदघाटन चार दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी २ सप्टेंबर रोजी झालं होतं. या नवीन ट्रेनचं सारथ्य करण्यासाठी बरेच रेल्वे इंजिन चालक उत्सुक असल्यामुळे ही मारहाणीची घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं. ट्रेनमध्ये ड्युटी लावण्याच्या पद्धतीवर असलेली नाराजी आता थेट रेल्वे बोर्डापर्यंत पोहचली आहे. या वादामुळे वंदे भारत ट्रेन उशिरा धावत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

वंदे भारत चालवण्याची दोन रेल्वे मंडळातील चालकांची इच्छा 

राजस्थानातील उत्तर पश्चिम रेल्वेच्या अजमेर मंडळांतर्गत येणाऱ्या उदयपूर स्टेशनवरून वंदे भारत ट्रेन सुटते. त्यानंतर पश्चिम-मध्य रेल्वेच्या कोटा मंडळातून प्रवास करत उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या आग्रा मंडळापर्यंत प्रवास करते. दरम्यान, वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून निर्माण झालेला वाद नवा नाहीए. कोटा आणि आग्रा या दोन रेल्वे मंडळातून धावणाऱ्या उदयपूर-आग्रा वंदे भारतचं सारथ्य करण्याची दोन्ही मंडळातील चालकांची इच्छा व्यक्त केली होती. २ सप्टेंबर उदघाटन झाल्यानंतर उदयपूरहून कोटा येथे ही ट्रेन पोहचल्यानंतर पुढे आग्रा रेल्वे मंडळाच्या चालकांना ही ट्रेन आग्र्यापर्यंत चालवायची होती. मात्र कोटा डिव्हिजनच्या चालकाने त्यास नकार देत स्वतःच ही ट्रेन आग्रा स्टेशनपर्यंत चालवत नेली होती. या मुद्दावरून दोन्ही मंडळांच्या चालकांदरम्यान वाद निर्माण झाला होता. 

नव्याने सुरू झालेल्या रेल्वेत ड्युटी केल्यास उघडतात बढतीची दारं

दरम्यान, नव्याने सुरू झालेल्या कोणत्याही रेल्वेगाडीत चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी ड्युटी केल्यास कर्मचाऱ्यांना विभागांतर्गत बढती मिळण्याची संधी निर्माण होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन रेल्वे मंडळातून धावणाऱ्या ट्रेनच्या सारथ्याविषयीचा वाद तसा जुनाच आहे. मात्र हा वाद शांततेनेही मिटवता आला असता, असं काहींचं म्हणण आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांदरम्यानच्या या भांडणामुळे वंदे भारतला सतत विरोध होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.