'इंडिगो'च्या दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये प्रवाशाला खाण्यासाठी देण्यात आलेल्या सँडविचमध्ये जिवंत अळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिला प्रवाशाने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आहारतज्ञ असलेल्या खुशबू गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर विमानप्रवासातील आपला अनुभव शेअर केला आहे. इन्स्टा पोस्टमध्ये गुप्ता यांनी व्हिडिओही शेअर केला आहे. फ्लाइटमध्ये असताना त्यांनी एक सँडविच ऑर्डर केले होते. त्यात त्यांना एक जिवंत अळी आढळून आली. दरम्यान, इंडिगो एअरलाइनने या घटनेबद्दल एक निवेदन जारी केले आहे. इंडिगोने या महिला प्रवाशाची माफी मागितली आहे.
गुप्ता यांनी या घटनेबाबत त्यांच्या इन्स्टाग्रामवर सविस्तर लिहिलं आहे. ‘मी लवकरच इंडिगोकडे ईमेलद्वारे अधिकृत तक्रार करणार आहे. विमानात मला देण्यात आलेलं सँडविच अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं हे एक आहारतज्ञ म्हणून मी सांगू इच्छिते. याबाबत मी फ्लाइट अटेंडंटला कल्पना दिली तरीसुद्धा तिने इतर प्रवाशांना सँडविच देणे सुरूच ठेवले. विमानात प्रवाशांमध्ये लहान मुलं, वृद्ध आणि इतर प्रवासी होते. अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने एखाद्याला संसर्ग झाला तर? मी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा मुद्दा सोशल मीडियावर मांडत आहे. मला विमान कंपनीकडून कोणत्याही प्रकारची भरपाई नकोय. त्याची मला गरज नाही. प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही तुमची सर्वोच्च प्राथमिकता असणार एवढे फक्त एक आश्वासन हवे.' असं गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर इंडिगोने एक निवेदन जारी करून प्रवाशाची माफी मागितली आहे. इंडिगोकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
‘आमच्या एका प्रवाशाने दिल्ली ते मुंबई फ्लाइटमध्ये (फ्लाइट क्रमांक 6E 6107) त्यांना आलेल्या अनुभवाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्याची आम्हाला जाणीव आहे. विमानात सर्वोच्च दर्जाचे अन्न आणि पेय सेवा देण्याबाबत आम्ही बांधिल आहोत. सँडविचची तपासणी केल्यानंतर आमच्या क्रूने सँडविच विक्रीची सेवा ताबडतोब बंद केली होती. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. आमच्या केटररशी बोलून योग्य ते सुधारात्मक उपाय करण्याविषयी सांगितले जाईल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत' असं इंडिगोच्या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित बातम्या