जगात कोणत्या देशाकडे सर्वात विनाशकारी शस्त्रांनी सज्ज असे शक्तिशाली लष्कर आहे यावरून त्या देशाची ताकद कळते. जगाला शांतता आणि आपसातील सौहार्दपूर्ण संबंधांची गरज आहे, यात शंकाच नाही. परंतु देशाच्या सीमांचे रक्षण करताना अनेकवेळा सशस्त्र संघर्ष अपरिहार्य ठरत असतो. अशावेळी कोणत्याही बाह्य आक्रमणापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम सैन्य आणि अत्याधुनिक शस्त्रे आवश्यक ठरत असतात. गेले अनेक महिने सुरू असलेला रशिया-युक्रेनदरम्यानचे युद्ध असो की सध्या गाझामध्ये सुरू असलेली लढाई, संघर्ष हा अटळ ठरतो हे एक क्रूर परंतु वस्तुस्थिती आहे. जगात किती देशांकडे अव्वल दर्जाचे सैन्य आहे, हे जाणून घेण्याबाबत सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता असते.
येथे आपण जगातील सर्वात शक्तीशाली अशा पाच लष्करी शक्तींची माहिती घेणार आहोत. जागतिक लष्करी सामर्थ्यामध्ये भारताचे स्थान काय आहे, हेही पाहणार आहोत.
अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य हे संपूर्ण जगात क्रमांक १ चे मानले जाते. अमेरिकेच्या लष्करात तब्बल १३ लाख सैनिक आहेत. अमेरिकेत लष्करावर दरवर्षी ७७० अब्ज डॉलर एवढा खर्च केला जातो. अमेरिकेच्या लष्कराच्या ताफ्यात तब्बल १३,२४७ लढावू विमाने असून ४५,१९३ लष्करी वाहने आणि ६,६१२ रणगाड्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या लष्कराकडे ४८४ युद्धनौका असून ११ विमानवाहू जहाज आणि ९ हेलिकॉप्टर वाहू जहाजांचा यात समावेश आहे. अमेरिकेच्या नौसेनेकडे ६८ पाणबुड्यांचा ताफा आहे. अमेरिकी लष्कराकडे अत्याधुनिक असे युद्ध तंत्रज्ञान असून सर्वात आधुनिक लष्कर मानले जाते.
अमेरिकेनंतर रशिया हा जगात सर्वाधिक शक्तिशाली लष्कर असणारा देश मानला जातो. लष्करी सामुग्रीचे उत्पादन करणारा आणि निर्यात करणारा जगातील मोजक्या देशांमध्ये रशियाची गणना होते. रशियन सैन्याकडे जगात सर्वात जास्त रणगाडे आणि क्षेपणास्त्र आहे. रशियन लष्कराच्या ताफ्यात ८ लाख ५० हजार सैनिक आहेत. रशियामध्ये लष्करावर १५४ अब्ज डॉलर एवढा वार्षिक खर्च केला जातो. रशियाच्या सैन्याकडे ४१७३ युद्धक विमाने असून ३०,१२२ लष्करी वाहने आणि १२,४२० रणगाडे आहेत. रशियन नौसेनेकडे ६०५ युद्धक जहाजे आणि ७० पाणबुड्या आहेत.
चीन हा अल्पावधीत जगातला एक मजबूत लष्करी सामर्थ्य असलेला देश बनला आहे. सैनिकांच्या एकूण संख्येच्या दृष्टिने चीन हा जगात सर्वाधिक सैनिक संख्या म्हणजे २० लाख सैनिक असलेला देश आहे. चीन हा देश आपल्या लष्करावर दरवर्षी २५० अब्ज डॉलर एवढा अफाट खर्च करत असतो. जगात अमेरिकेनंतर चीन हा देश लष्करावर सर्वाधिक खर्च करतो. चीनच्या सैन्याकडे ३२८५ युद्ध विमाने आहेत. तर ३५ हजार लष्करी वाहने आणि ५२५० रणगाडे आहेत. चीनच्या नौसेनेकडे ७७७ युद्ध जहाज असून दोन विमानवाहू नौका आणि ७९ पाणबुड्या आहेत. येत्या काळात चीनच्या लष्कराचे सामर्थ्य अधिक मजबूत होणार असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यानंतर भारताने मोठ्या कौशल्य आणि परिश्रमाने आपलं लष्करी सामर्थ्य उभारलं आहे. सुरूवातीच्या काळात ब्रिटनच्या सहकार्याने भारताने आपलं लष्करी सामर्थ्यात वाढ केली. भारतीय लष्कराने आतापर्यंत शेजारी चीन आणि पाकिस्तान या देशांशी युद्धही केले आहे. भारतीय लष्करामध्ये १४ लाख सैनिक असून ४९.६ अब्ज डॉलर एवढे वार्षिक संरक्षण बजेट आहे. भारतीय लष्कराकडे एकूण २१८२ युद्ध विमाने असून १२ हजार लष्करी वाहने आणि ४,६१४ रणगाडे आहेत. भारतीय नौसेनेकडे १५० युद्धक जहाज असून दोन विमानवाहू जहाज आणि १८ पाणबुड्या आहेत.
जपानकडे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक सामर्थ्यशाली लष्कर आहे. एकूण सैनिकांच्या संख्येच्या दृष्टिने जगात जपानी लष्कराचा क्रमांक १९ वा लागतो. परंतु तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक प्रशिक्षणामुळे जपानचे सैन्य हे सर्वात चपळ मानले जाते. जपानच्या लष्कराच्या ताफ्यात २ लाख ४० हजार एकूण सैनिक आहेत. जपान आपल्या लष्करावर दरवर्षी ४७ अब्ज डॉलर इतका खर्च करतो. जपानच्या लष्कराकडे १,४४९ युद्धक विमाने तर ५५०० लष्करी वाहने आणि १००७ रणगाडे आहेत. जपानकडे १५५ युद्ध जहाज असून २१ पाणबुड्या आहेत.
संबंधित बातम्या