Lieutenant General Dhiraj Seth COS of Southern Command : भारतीय लष्कराची सर्वात मोठी कमांड म्हणून ओळख असलेल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या जनरल ऑफिसर कमाडंन्टपदी लेफ्टनंट जनरल धिरज सेठ यांची निवड झाली आहे. त्यांनी सोमवारी लष्कराच्या दक्षिण विभागाचे ५१ वे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला. लष्करी परंपरेनुसार लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पुण्यातील युद्ध स्मारक येथे झालेल्या सोहळ्यात युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांना दक्षिण विभागाच्या मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. २० डिसेंबर १९८६ रोजी सेकंड लान्सर्समधील नियुक्तीने त्यांनी त्यांच्या लष्करी कारकिर्दीला सुरूवात केली. लष्करी प्रशिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रमांमध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. यंग ऑफिसर्स प्रशिक्षण अभ्यासक्रमात त्यांनी सिल्व्हर सेंच्युरियन पुरस्कार मिळवला आहे. तर रेडिओ इन्स्ट्रक्टर प्रशिक्षण अभ्यासक्रम व ज्युनिअर कमांड प्रशिक्षण अभ्यासक्रमात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी प्रशिक्षण अभ्यासक्रम अर्थात डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कोर्समध्येदेखील सेठ यांनी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळवला आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी फ्रान्समधील पॅरिस इथल्या लष्करी महाविद्यालयातील प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड जनरल स्टाफ कोर्स हा प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील मॉन्टेरी येथील नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूलमधील इंटरनॅशनल डिफेन्स एक्विझिशन मॅनेजमेंट कोर्स हा प्रशिक्षण अभ्यासक्रम, महू तसेच नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयातून हायर कमांड कोर्स हा प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी स्कायनर्स हॉर्स ९८ सशस्त्र लष्करी तुकडीचे प्रमुख, दहशतवादविरोधी दलाचे (काउंटर इन्सर्जेन्सी युनिफॉर्म फोर्स) प्रमुख, २१ कोअरचे प्रमुख तसेच दिल्ली क्षेत्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षिक आणि वरिष्ठ सहाय्यक म्हणून, तर अहमदनगर येथील आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कुल येथे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. १९९५ ते १९९६ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंगोला व्हेरिफेकेश मिशन (UNAVEM-III) या मोहिमेचे कार्यकारी अधिकारी म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी भारतीय लष्करात स्वतंत्र आर्मर्ड ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर, लष्करी सचिव शाखेचे सहाय्यक लष्करी सचिव, दक्षिण पश्चिम कमांड मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ब्रिगेडियर जनरल (कार्यान्वय), परिप्रेक्ष्य नियोजन (योजना) विभागाचे उपमहासंचालक आणि शस्त्रास्त्रे आणि उपकरण विभागाचे अतिरिक्त महासंचालक या महत्वाच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. सेठ यांनी य यापूर्वी दक्षिण पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.
संबंधित बातम्या