Sanjay Raut on NDA Alliance : लोकसभा निवडणुकी नंतर सत्तास्थापनेसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी प्रयत्न सुरू केले आहे. टीडीपी आणि जेडीयूने मोदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काल एनडीएच्या नेत्यांची बैठक झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काल इंडिया आघाडीची देखील बैठक झाली. यात इंडिया आघाडीचे २८ नेते उपस्थित होते. भारतातील जनतेने मोदींच्या विरोधात कौल दिला असल्याचं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटले असून त्यामुळे इंडिया आघाडी कडून त्यांच्याकडून बहुमत सिद्ध करण्याकरता जुळवाजुळ सुरू करण्यात आली आहे. या बाबट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर टीका करत सूचक वक्तव्य केले आहे.
इंडिया आघाडीची दिल्ली येथे बुधवारी बैठक झाली या बैठकीला २८ पक्षाचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, “आम्ही राष्ट्रपती भवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहोत. मोदींना शपथ घेऊद्या. पण नंतर खेळ सुरू होणार आहे. हे सरकार चालणार नाही. आम्हाला तर वाटतं मोदींनी शपथ घ्यावी. ८ तारखेला नाही तर आज रात्रीच शपथ घ्यावी, त्यांच्यावतीने आम्ही पेढे वाटू. आम्ही योग्य वेळी पाऊल उचलू.
चंद्राबाबू नायडू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो. ते फक्त भाजपचे नसून सर्व पक्षांचे आहेत. त्यांनी काँग्रेस आणि भाजपाबरोबर काम केलं आहे. मोदींचा हम करे सो कायदा आहे. त्यामुळे या आघाडीत व्यक्तिमत्त्व किती फिट बसतात हे पाहावं लागेल, असे राऊत म्हणाले.
या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपला २४० जागा मिळाल्या. त्यांना बहुमतासाठी ३२ जागांची गरज आहे. तर एनडीएतील भाजपाचा मित्र पक्ष टीडीपीकडे आंध्र प्रदेशात १६ खासदार असून बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे १२ खासदार आहेत. तर लोक जनशक्ती पार्टीचे ५ खासदार आहेत. त्यामुळे या बळावर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
इंडिया आघाडीने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. इंडिया आघाडीकडे २३४ जागा असून त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी ३८ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. देशात १८ खासदार निवडणू आले आहेत. तर टीडीपीचे १६ खासदार व नितीश कुमारांचे १२ खासदार इंडिया आघाडी सोबत आले तर इंडिया आघाडीला सत्ता स्थापनेचा दावा करता येणार आहे. मात्र, टीडीपी व जेडीयूने काल झालेल्या एनडीएच्या सभेत मोदी यांना पाठिंबा जाहिर केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आता काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.