राजस्थानातील जोधपूर येथील आसाराम बापूच्या वादग्रस्त आश्रमात बापूच्या तीन सहकाऱ्यांनी मिळून एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एका ५६ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी या आश्रमातील विधी विभागाच्या प्रमुखासह व्यवस्थापनातील अन्य तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या आदेशानंतर आसाराम बापूंच्या जोधपूर येथील आश्रमाचे विधी प्रमुख पंकज मिरचंदानी ऊर्फ अर्जुन, व्यवस्थापन कर्मचारी चेतनराम साहू, सचित भोला आणि जीवन यांच्याविरोधात बोरानाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला मूळची मध्य प्रदेशातील आहे. जोधपूरमध्ये पाल रोडवर आसाराम बापूचे मोठे आश्रम आहे. या आश्रमात ही महिला वारंवार जात होती. गेल्या वर्षी २१ जुलै रोजी इतर सहा महिला भाविकांसह ही महिला आसाराम बापूचे रेकॉर्डेड प्रवचन ऐकण्यासाठी आश्रमात गेली होती. या प्रवचन संपल्यानंतर या महिलेने आसाराम बापूंविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणांचे पुढे काय झाले, असं आश्रमातील लोकांना विचारलं. त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्या महिलेला आश्रमाचे व्यवस्थापक आणि विधी प्रमुख मीरचंदानी यांना भेटण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी विनयभंगाची घटना घडली असल्याचे महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
विनयभंगाचा गुन्हा घडला त्याच दिवशी घटनेनंतर ही महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली होती. पण पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप फिर्यादीने केला आहे. पीडितेने नंतर पोलिस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली होती. मात्र न्यायालयात धाव घेतल्यानंतरच एफआयआर दाखल करण्यात आला, असं फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
जोधपूरच्या याच आश्रम आसाराम बापूने २०१३ साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या गुन्ह्याखाली आसाराम बापू २०१८ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. दरम्यान, १४ जानेवारी २०२५ रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम बापूला ३१ मार्च २०२५ पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
संबंधित बातम्या