Lebanon Pager Blast : लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. खिशातील पेजरने हे बॉम्बस्फोट घडवल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे २७५० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये इराणचे राजदूत मोजितबा अमानी, आरोग्य कर्मचारी आणि हिजबुल्लाहच्या सैनिकांचा समावेश आहे. या स्फोटामागे इस्त्रायलचा हात असल्याचा संशय हिजबुल्लाने व्यक्त केला आहे.
इराणपुरस्कृत लेबनॉन दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे शेकडो सदस्य मंगळवारी त्यांच्याच सुमारे एक हजार पेजर्समध्ये झालेल्या साखळी स्फोटाने जखमी झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इराणच्या राजदूतासह २७५० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाहचे सदस्य परस्पर संवादासाठी या पेजरचा वापर करत असत, मात्र ते एकाच वेळी हॅक करून त्याचा स्फोट घडवून आणण्यात आले. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी यांचाही समावेश आहे. लेबनॉनचे आरोग्यमंत्री फिरास अबियाद यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, देशभरात झालेल्या या स्फोटात आठ जण ठार झाले असून सुमारे २,७५० जण जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले असून सर्व पेजर एकाच वेळी फुटल्याचा दावा केला आहे. अशा प्रकारची ही एक वेगळी घटना आहे. हिजबुल्लाहने म्हटले आहे की, सुरक्षेतील ही सर्वात मोठी त्रुटी आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेजर स्फोट हा इस्रायलबरोबरच्या सुमारे वर्षभराच्या युद्धात संघटनेने केलेला सर्वात मोठा सुरक्षा भंग आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बैरूतच्या दक्षिण उपनगर दहिया येथे हे स्फोट झाले. लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्था एनएनएने दिलेल्या वृत्तानुसार, लेबनॉनच्या मध्यवर्ती बेका खोऱ्यातील अली अल-नाहरी आणि रियाक या शहरांमध्येही 'हॅक' करण्यात आलेल्या पेजर डिव्हाइसचा स्फोट झाला आहे. ही तिन्ही ठिकाणे हिजबुल्लाहचा बालेकिल्ला मानली जातात. लेबनॉनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा इस्रायली हल्ला असल्याचे मानले जात आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ज्या नागरिकांकडे पेजर आहेत त्यांनी ते फेकून देण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलने गाझावर आक्रमण सुरू केल्यापासून इस्रायली आणि इराणसमर्थित हिजबुल्लाह दहशतवादी यांच्यात सीमेपलीकडून संघर्ष सुरू आहे, परंतु अलीकडच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले वाढले आहेत. हिजबुल्लाहवर अमेरिकेसह युरोपीय देशांनी बंदी घातली आहे.