Deepika Padukone To Students On Mental Health : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'परीक्षा पे चर्चा २०२५' सत्रात सहभाग घेतला होता. यावेळी तिने नैराश्यावर मात कशी करावी हे सांगतांना तिचे वैयक्तिक अनुभव शेअर केले. मानसिक आरोग्यासाठी जनजागृती व संवादाची गरज असल्याचे दीपिकाने यावेळी म्हटले. भावना व्यक्त करणे आणि योग्य वेळी मदत घेणे खूप महत्त्वाचं आहे असे देखील दीपिका यावेळी म्हणाली.
'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना अनेक विषयांवर टिप्स दिल्या. यावेळी दीपिकाने विद्यार्थ्यांना तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी व तो कमी करण्यासाठी व नैराश्याला कसा लढा द्यावा या बद्दल मार्गदर्शन केले. नैराश्य कसे हाताळवे?, परीक्षा आणि स्पर्धा यांच्यात मानसिक संतुलन कसे राखावे? यावर दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना उत्तरे दिली.
परीक्षा आणि स्पर्धा यांच्यात मानसिक समतोल कसा राखायचा, असे विचारले असता, दीपिका म्हणाली, 'हा तुमच्या आयुष्याचा भाग आहे. आपली बलस्थाने आणि कमतरता जाणून घ्यायला हव्यात. आपल्या कमजोरीवर काम करून त्याला बलस्थान बनवावे. त्यामुळे लक्ष केंद्रित करून पुढे जायला हवं. जगतांना स्वत:शी स्पर्धा करावी लागते.
आपले मानसिक आरोग्य हा आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते निरोगी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर दीपिका म्हणाली, मानसिक आरोग्य जपण्यासाठी बाहेर फिरायला जावे, चांगला सूर्यप्रकाशात घ्यावा, स्वच्छ हवा घ्यावी. चांगल्या लोकांशी भेटा, चांगली झोप घ्या.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी पालक आणि शिक्षक खूप दबाव टाकतात, यावर दीपिका म्हणाली की, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. आपण तणावग्रस्त आहात असे वाटत असेल तर ते ओळखा आणि त्याबद्दल आपल्या पालकांशी बोला. ध्यान करा, व्यायाम करा किंवा तुमच्या पालकांशी बोला, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे, याबद्दल स्पष्ट राहा. तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या. मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या भावना लोकांना सांगण्यास कधीही संकोच करू नका. उघडपणे बोलण्यास कधीही संकोच करू नका. तुमचे विचार आणि चिंतेबाबत आपल्या जवळच्या लोकांशी बोलून तुम्हाला बरे वाटू शकते, असे देखील दीपिकाने म्हटले आहे.
दीपिकाने ती डिप्रेशनमध्ये असतांना तिला आलेले अनुभव व त्यावर तिने कशी मात मिळवली या बाबत देखील मुलांना मार्गदर्शन केले. दीपिका म्हणाली की, मी शाळेत असताना अभ्यास, खेळ आणि मॉडेलिंग अशी अनेक कामे करत होती. २०१४मध्ये मी काम करत असतांना अचानक बेशुद्ध पडली. दरम्यान, काही दिवसांनी मी नैराश्यात असल्याचं मला जाणवलं. नैराश्य आले तरी ते ओळखता येत नाही. मी याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मी मुंबईत एकटीच राहायची. मी या बाबत कुणाला काही सांगितले नाही. जेव्हा माझी आई मुंबईत आली व काही दिवसांनी निघून गेली तेव्हा मला रडावंसं वाटलं. मला निराशा वाटत होती. माझी जगण्याची सर्व इच्छाच संपली होती. त्यावेळी मी मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली व माझ्या आजारांवर नियंत्रण मिळवलं.
दीपिका म्हणाली, तणाव जाणवणे ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. पण आपण तणाव कसा हाताळत आहोत हे महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या वेळी संयम बाळगा, कोणता प्रश्न यायचा, काय वाचले नाही, याचा मोठा तणाव येतो तेव्हा हा तणाव आपल्याला योग्य प्रकारे हाताळावा लागतो.
संबंधित बातम्या