Meesho: मीशोवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री, पाहून भडकले लोक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Meesho: मीशोवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री, पाहून भडकले लोक!

Meesho: मीशोवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री, पाहून भडकले लोक!

Nov 05, 2024 02:13 PM IST

Lawrence Bishnoi T-Shirts: मीशो आणि फ्लिपकार्टवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री केली जात असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मीशोवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री
मीशोवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री

Meesho and Flipkart News: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री केल्याप्रकरणी लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट मीशो वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या टी-शर्टचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. असे कृत्य गुन्हेगारीला प्रवृत्त करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. अशा अनेक टीकेला सामोरे गेल्यानंतर आता मिशोने हे टी-शर्ट वेबसाइटवरून काढून टाकल्याची माहिती दिली आहे.

चित्रपट निर्माते अलिशान जाफरी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली, ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की, 'ई-कॉमर्स वेबसाईट मीशोवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री केली जात आहे.' हे टी-शर्ट पांढऱ्या रंगाचे आहे, ज्यावर लॉरेन्स बिश्नोईचा चेहरा दिसत आहे. एवढेच नव्हेतर, या टी-शर्टवर 'गँगस्टर' असाही मजकूर दिसत आहे. मीशो आणि फ्लिपकार्टसारख्या इतर प्लॅटफॉर्मवर हे टी-शर्ट १६८ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे टी- शर्ट लहान मुलांसाठी देखील विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टीकेला सामोरे गेल्यानंतर आता मिशोने लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले हे टी-शर्ट आपल्या वेबसाइटवरून काढून टाकले. मिशोने यावर स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, आम्ही हे टी-शर्ट बेवसाइटवरून काढून टाकले आहे. परंतु, गुगलवर सर्च केल्यानंतर या टी-शर्टचे फोटो येत आहेत. पण ही टी- शर्ट विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. या टी- शर्टची विक्री आणि उत्पादन थांबवण्यासाठी आम्ही तातडीने पावले उचलली आहेत. आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह शॉपिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी मीशो कटिबद्ध आहे, असे मिशोच्या प्रवक्त्याने हिंदुस्तान टाइम्सला सांगितले आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गुंडा आहे. सिंडिकेटचा पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणात तो दोषी आढळला आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. याशिवाय, बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि मयत बाबा सिद्दिकी यांच्याा मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यासह अनेक हायप्रोफाईल गुन्ह्यांमध्ये तो सामील आहे.

मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया प्रोफाइल फोटोमध्ये गुन्हेगारांचा फोटो ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रोफाइल फोटोमध्ये लॉरेन्स बिश्नोई, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासारख्या गुन्हेगारांचे फोटो दिसून आले. गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या अशा कृत्याविरोधात मुंबई पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर