lawrence bishnoi : तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईला मारण्यासाठी १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. शेखावत यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीने आपल्या नावाने १ कोटी ५० लाख रुपयांची सुपारी दिल्याचं म्हटलं आहे. लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसाला बक्षीस जाहीर करून प्रकाशझोतात आलेल्या शेखावत यांनी बिश्नोई टोळीने बिहारमध्ये त्यांना मारण्याचा प्लॅन केल्याचा आरोप केला आहे. असे असतांना देखील, त्यांच्या मनात कोणतीही भीती नसल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.
राज शेखावत यांनी नुकतीच घोषणा केली होती की, जर एखाद्या पोलिसाने लॉरेन्स बिश्नोईला ठार मारले तर त्या पोलिसाला १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देईल. क्षत्रिय करणी सेनाही त्या पोलिसाच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेईल आणि त्यांच्या प्रत्येक गरज पूर्ण करेल, असे त्यांनी म्हटले होते. कोट्यवधी लोक क्षत्रिय करणी सेनेशी संबंधित असून त्यांनी काही पैसे देखील गोळा केले तर बक्षिसाच्या रकमेची व्यवस्था होईल, असे ते म्हणाले होते.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राज शेखावत यांनी त्यांना ठार मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईला सुपारी दिली असल्याचे धक्कादायक वक्तव्य केलं. लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी मारण्याचा धमक्या देखील दिल्याचे त्यांनी म्हटलं आहे. लॉरेन्सच्या गुंडांनी मला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट (सुपारी किलिंग) दिल्याची माहिती मला मिळाली आहे. सिवान (बिहार) येथील ओसामा खानला १.५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. बाकी काम झाल्यावर दिली जाईल अशी देखील माहिती माझ्यापर्यंत आली आहे असे शेखावत म्हणाले.
राज शेखावत म्हणाले की, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. ज्या गुंडांना मला मारण्यासाठी पाठवण्यात आले होते, ते लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचे सदस्य आहेत. सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सर्व सदस्यांच्या एन्काऊंटरची मागणी केली असल्याचे राज शेखावत यांनी म्हटले आहे. तुम्हाला भीती वाटत नाही का, असे विचारले असता शेखावत म्हणाले, या जगात मला देवाने आणले आहे आणि या जगातून देवच घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला कसली भीती असे शेखावत यांनी म्हटलं आहे. लॉरेन्स बिश्नोई एक व्यक्ती आहे, राज शेखावत त्याला का घाबरेल? तुम्ही म्हणता त्यांच्याकडे शूटर आहेत, करणी सेनेपेक्षा मोठी सेना या देशात नाही. माझ्याकडे कोट्यवधी करणी सैनिक आहेत. आम्ही कुणालाही घाबरत नाही. '