Lok Sabha Elections 2024 : लोकसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?, पाहा ताजा सर्व्हे
Lok Sabha Elections 2024 : संसदेच्या पावसाळी अधवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता देशाचा मूड सांगणारा सर्व्हे समोर आला आहे.
Lok Sabha Elections 2024 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. याशिवाय मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. परंतु अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता देशातील राजकीय स्थिती सतत बदलत असल्याने देशाचा मूड सांगणारा ताजा सर्व्हे समोर आला आहे. त्यात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर मोदी सरकारला पुन्हा बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय काँग्रेससह विरोधी पक्षांना किती जागा मिळणार, याचाही खुलासा करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
टाइम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला २९६ ते ३२६ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं सर्व्हेतील अंदाजानुसार पीएम मोदी यांचं सरकार सलग तिसऱ्यांदा बहुमतासह केंद्रातील सत्तेत बसण्याचा अंदाज आहे. त्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १६० ते १९० जागा मिळणार असल्याचं सर्व्हेतून सांगण्यात आलं आहे. सर्व्हेनुसार एनडीएला ४२ तर इंडिया आघाडीला ४० टक्के मतं मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता मतांच्या टक्केवारीत भाजप आणि इंडिया आघाडीत जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा सर्व्हेचा अंदाज आहे. तसेच इंडिया आघाडीला १६० ते १९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर पक्षाला २४ ते २५ जागा, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसला ९ ते ११ जागा, ओडिशातील पटनायक यांच्या बीजू जनता दलाला १२ ते १४ आणि अन्य पक्षांना ११ ते १६ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.