मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rohini Acharya : कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला; नितीश कुमारांच्या पलटीवर लालूंच्या मुलीची तिखट प्रतिक्रिया

Rohini Acharya : कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला; नितीश कुमारांच्या पलटीवर लालूंच्या मुलीची तिखट प्रतिक्रिया

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 28, 2024 02:46 PM IST

Rohini Acharya on Nitish Kumar : लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी नितीश कुमार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

Nitish Kumar - Rohini Acharya
Nitish Kumar - Rohini Acharya

नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी (India Alliance) व राष्ट्रीय जनता दलाची (RJD) साथ सोडून पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये ते भाजपसोबत सरकार स्थापन करणार असून नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या घडामोडींवर आरजेडीच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी नितीश कुमार यांच्यावर अत्यंत कवडट शब्दांत टीका केली आहे.

रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून बिहारमधील राजकीय घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका मागोमाग एक पोस्ट केल्या आहेत. नितीश कुमार यांना कचरा आणि भाजपला कचराकुंडी अशी उपमा त्यांनी दिली आहे. ‘कचरा पुन्हा एकदा कचराकुंडीतच गेला. कचरावेचक मंडळाला हा दुर्गंधीयुक्त कचरा लखलाभ,’ असं रोहिणी यांनी म्हटलं आहे. सोबत त्यांनी कचराकुंडीचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

रोहिणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत नरेंद्र मोदी हे नितीश कुमार यांची लाज काढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना आचार्य यांनी अत्यंत बोचरी टिप्पणी केली आहे. ‘थुंकी चाटणाऱ्यांनी स्वत:ला सूर्य समजू नये,’ असं त्यांनी मोदींना उद्देशून म्हटलं आहे.

याशिवाय, रोहिणी आचार्य यांनी लालू यादव व तेजस्वी यादव यांचेही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातील एकामध्ये लालू हे नितीश कुमार यांना साप म्हणताना दिसत आहेत. साप जसा दर दोन वर्षांनी आपली कात टाकतो, त्याचप्रमाणे नितीश देखील कात टाकतात, असं ते म्हणाले होते.

तेजस्वी यादव यांचा व्हिडिओ हा कार्यकर्त्यांना धीर देणारा आहे. 'लालू यादव कधीही भाजपसमोर झुकले नाहीत. त्यामुळं तेजस्वी यादवही देखील झुकणार नाही. अजिबात घाबरायची गरज नाही. आपण मजबुतीनं पुढं जाऊ, असं तेजस्वी यादव व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

WhatsApp channel

विभाग