Agra Divorce News : कौटुंबिक वाद आणि त्या वादातून होणारे घटस्फोट ही काही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. कुटुंब न्यायालयातील प्रकरणांवर नजर टाकल्यास आपल्याला या सगळ्याचा सहज अंदाज येईल. घटस्फोटाची कारणंही वेगवेगळी आणि गंभीर असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून एक विचित्र प्रकरण पुढं आलं आहे. पाच रुपयांच्या कुरकऱ्याच्या पॅकेटसाठी एका महिलेनं घटस्फोटाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटासाठी हट्ट धरणाऱ्या महिलेला मसालेदार पदार्थ खाण्याची भारी आवड आहे. ही आवड आता तिचं व्यसन झालं आहे. ती तिच्या नवऱ्याला रोज पाच रुपयांचे कुरकुरे आणायला सांगायची. अति मसालेदार खाण्यावरून नवरा तिला सतत बोलायचा. त्यांच्यात वाद व्हायचे, पण घरी येताना तो तिच्यासाठी कुरकुरे घेऊनही यायचा. एक दिवस घाईगडबडीत तो बायकोचं आवडतं स्नॅक्स घरी आणायला विसरला आणि मोठा वाद झाला, असं ‘लाइव्ह हिंदुस्तान’ या हिंदी वेबसाइटवरील वृत्तात म्हटलं आहे.
रोजचा आनंद नवऱ्यानं हिरावून घेतल्यानं ती संतापली. ती नवऱ्याचं घर सोडून आई-वडिलांच्या घरी गेली, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर तिनं घटस्फोटासाठी पोलिसांकडं धाव घेतली. आग्रा येथील शाहगंज पोलिसांनी हा प्रकार समजून घेतला. हे प्रकरण फार गंभीर नसल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या दाम्पत्याला कौटुंबिक समुपदेशनासाठी पाठवलं.
गेल्या वर्षी या जोडप्याचं लग्न झालं होतं आणि सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत चाललेलं दिसत होतं. मात्र, जसजसे काही महिने उलटले तसं बायकोचं कुरकुरे वेड नवऱ्याला चिंताजनक वाटू लागलं. बायको रोज जंक फूड आणायला सांगत होती, असं त्यानं सांगितलं.
कुरकुरे वेड आणि त्यावरून होणारे वाद हे घटस्फोट मागण्याचं कारण नवऱ्यानं दिलं असलं तरी बायकोचं म्हणणं वेगळंच आहे. नवऱ्यानं मारहाण केल्यामुळं मी आई-वडिलांच्या घरी गेले, असं संबंधित महिलेनं म्हटलं आहे.
अलीकडंच आग्रा येथील आणखी एका जोडप्यानं घटस्फोटाची मागणी केली होती. त्यांच्यातील वादाचं कारण एक साडी ठरली होती. बायकोनं नवऱ्याच्या आवडीची साडी नेसण्यास नकार दिल्यानं त्यांच्यात दररोज वाद होत होते. हा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला होता.