Uttar Pradesh Police: महाकुंभासाठी उत्तर प्रदेशात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. प्रयागराज आणि आसपासच्या ८ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ७ रस्त्यांवरून वाहने आणि लोकांची तपासणी करण्यासाठी १०२ बूथ उभारण्यात आले आहेत. रस्ता सुरक्षेसाठी एकूण १०२६ पोलीस तैनात करण्यात आले, यामध्ये ७१ निरीक्षक, २३४ उपनिरीक्षक, ६४५ कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आणि ७६ महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे. एवढेच नव्हेतर महाकुंभातील लोकांच्या सुरक्षेसाठी, यावेळी यूपी पोलिसांनी बोटीवरच एक पोलिस चौकी उभारली आहे, ज्याला जल पोलीस असे नाव देण्यात आले आहे.
यात्रेकरूंना तात्काळ मदत मिळावी आणि पाण्यात आंघोळ करताना सुरक्षितता वाढावी, यासाठी बोटीवर तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या मोबाईल पोलीस युनिटला प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सक्रिय राहणे, मार्गदर्शन करणे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भाविकांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भाविकांच्या सुरक्षतेसाठी बोटीवर ट्रेंड लोकांना तैनात करण्यात आले. तसेच आवश्यक सुरक्षा उपकरणे, ट्रान्समीटर आणि रिसीव्हर अशा दोन स्थानकांमधील माहितीची देवाणघेवाण देखील केली जाते.
डीजीपी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये सुरक्षेसाठी ११३ होमगार्ड्स आणि बीआरडी जवान, केंद्रीय राखीव पोलिसांच्या ११ तुकड्या आणि पीएसीच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एक तुकडी आणि पीएसीच्या दोन प्लाटून देखील तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, प्रयागराजमध्ये २४ तास देखरेखीसाठी १० वज्र वाहने, १५ ड्रोन, ५ बॉम्ब निकामी पथके तैनात करण्यात आली आहेत.
२०२५ मध्ये होणारा महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा बनला आहे. हा महाकुंभ १४४ वर्षातून फक्त एकदाच होतो. महाकुंभमेळ्याचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, कुंभमेळ्यात कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल नाही. मेळा परिसरात कोणत्याही दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला परवानगी दिली जाणार नाही.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रयागराज मध्ये महाकुंभ २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी पर्यटकांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे उद्घाटन रविवारी केले. कुंभमेळ्याच्या काळात सुमारे १०,००० नियमित गाड्या आणि ३ हजार १३४ विशेष गाड्या चालवल्या जातील, ही संख्या मागील कुंभमेळ्यापेक्षा ४.५ पट जास्त आहे. या नियमित गाड्यांमध्ये १,८६९ अल्प पल्ल्याच्या गाड्या, ७०६ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि ५५९ रिंग ट्रेनचा समावेश आहे. प्रवासी रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी मालगाड्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) कडे वळविण्यात आल्या आहेत. महाकुंभ २०२५ मध्ये सुमारे ४० कोटी भाविक भेट देतील, असा अंदाज आहे.
संबंधित बातम्या