कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार डॉक्टरांची होणार पॉलीग्राफ चाचणी-kolkata rape murder cbi gets nod for polygraph test on ex principal 4 doctors ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार डॉक्टरांची होणार पॉलीग्राफ चाचणी

कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार डॉक्टरांची होणार पॉलीग्राफ चाचणी

Aug 22, 2024 11:16 PM IST

Kolkata rape-murder: ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर रुग्णालयाच्या आवारात बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या ९ ऑगस्टच्या घटनेचा तपास सीबीआय करत आहे

 कोलकाता बलात्कार प्रकरणात चार डॉक्टरांच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी परवानगी (HT Photo/Bachchan Kumar)
कोलकाता बलात्कार प्रकरणात चार डॉक्टरांच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी परवानगी (HT Photo/Bachchan Kumar)

कोलकाताच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य आणि चार डॉक्टरांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी शहरातील एका न्यायालयाकडून मिळवली. ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या ९ ऑगस्टच्या घटनेचा तपास सीबीआय करत आहे.

सीबीआयने सियालदह एसीजेएम न्यायालयात धाव घेत माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष आणि आरजी कर रुग्णालयातील चार डॉक्टरांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना गुरुवारी न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने परवानगी दिली आहे, असे सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने  सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सियालदह न्यायालयाला शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आवश्यक आदेश देण्याचे निर्देश दिले होते.  पॉलीग्राफ चाचणी करण्याची विनंती एसीजेएम सियालदह यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. एसीजेएम सियालदह २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या अर्जावर आदेश देईल,' असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

पॉलीग्राफ चाचणीचा निकाल "कबुलीजबाब" मानला जात नाही आणि तो न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही. या चाचण्या केवळ तपासकर्त्यांना त्यांच्या तपासात मदत करण्यासाठी आणि संशयिताकडून पुरावे मिळविण्यासाठी केल्या जातात आणि चाचणीचा पूर्ण यश दर असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यास  १४ तास उशीर" केल्याबद्दल प्रश्न विचारला. फेडरल एजन्सीने यापूर्वी सियालदह न्यायालयाकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय ची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या रॉय यांना अटक करण्यात आली आणि सीबीआयकडे सोपवण्यात आले.

एजन्सीने घोष यांची शुक्रवारपासून ७५ तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. या चारही डॉक्टरांची सीबीआयने यापूर्वी चौकशी केली होती. 

३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरने ८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आई-वडिलांशी शेवटचे बोलणे केले होते. लवकरच जेवण करणार असल्याचे तिने आई-वडिलांना सांगितले होते आणि चिकन भरता आणि पोळी मागवली होती. पीडित महिला आणि चार डॉक्टरांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास जेवण केले. नीरज चोप्रा सामन्यासाठी त्यांनी ऑलिंपिकही पाहिले होते. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी रात्री अडीचच्या सुमारास ती सेमिनार रूममध्ये झोपायला गेली, अशी माहिती आर. जी. कर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ४.३० च्या दरम्यान ही घटना घडली असून सकाळी पावणेनऊच्या सुमारास आपत्कालीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील चेस्ट सेमिनार रूममध्ये तिचा मृतदेह आढळून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने गुरुवारी सॉल्ट लेक येथे निषेध रॅली काढली. राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवनात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, ज्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी आणि भाजपचे राज्यसभेचे सदस्य समिक भट्टाचार्य यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

विभाग