कोलकात्याच्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी आरोपी गुन्हा केल्यानंतर घरी परतला आणि काही तास झोपला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने कपडे धुतल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांना सिव्हिल वॉलंटियर असलेल्या आरोपीच्या बूटवर रक्ताच्या खुणा आढळून आल्या. आरोपी व्यावसायिकदृष्ट्या रुग्णालयाशी संबंधित नसला तरी तो या परिसरात वारंवार येत असे.
पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. तिच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती जेवण करून विश्रांती घेण्यासाठी हॉलमध्ये गेली होती. पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान बलात्कार आणि हत्येची घटना घडली.
शहराचे पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी रविवारी तीन दिवसांत दुसऱ्यांदा वैद्यकीय आस्थापनाला भेट देऊन आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.
गुन्हा केल्यानंतर आरोपी पुन्हा राहत असलेल्या ठिकाणी गेला आणि शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत झोपला. जाग आल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने गुन्ह्यादरम्यान घातलेले कपडे धुतले. शोधादरम्यान त्याचे बूट सापडले असून त्यावर रक्ताचे डाग आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार पीडितेच्या डोळ्यातून, तोंडातून आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. तिच्या पायाला, मानेला, हाताला, ओठांना जखम झाली होती.
दरम्यान, पीटीआयने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, परिस्थितीजन्य पुरावे देखील डॉक्टरची आधी हत्या आणि नंतर बलात्कार झाल्याची शक्यता दर्शवितात.
"शवविच्छेदन अहवाल आज आमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मृत डॉक्टरच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केला आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत बैठक घेतली आणि आम्हाला वाटते की ते समाधानी आहेत. त्यांच्या मागणीनुसार येथे तैनात असलेल्या एका सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याला काढून टाकण्यात आले आहे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
आपत्कालीन विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या दोन सुरक्षारक्षकांना रुग्णालय प्रशासनाने कर्तव्यात कसूर केल्यामुळे कामावरून काढून टाकले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून म्हटले आहे की, कोलकात्यातील आर. जी. कर मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने आयएमएला शब्दापलीकडे धक्का बसला आहे. आयएमएने पश्चिम बंगाल सरकारकडे आपल्या मागण्यांची यादीही नमूद केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आयएमएने नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात गुन्ह्यास कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीची सविस्तर चौकशी करण्याची आणि कामाच्या ठिकाणी डॉक्टरांची विशेषत: महिलांची सुरक्षा सुधारण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे.