Kolkata Murder Case : कोलकात्यातील एका रुग्णालयात बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या आई-वडिलांना प्रशासनाकडून नजरकैदेत ठेवले असल्याचा दावा पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
चौधरी यांनी म्हटले की, मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी बराच वेळ बोललो. पोलिसांनी या कुटुंबाला नजरकैदेत ठेवले आहे. विविध कारने सांगून ते त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. पोलिसांनी त्यांच्या भोवती बॅरिकेड तयार केले आहे, सीआयएसएफला याची काहीच कल्पना नाही, असे चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कनिष्ठ डॉक्टरांकडून सुरू असलेला विरोध आणि या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे.
चौधरी यांनी दावा केला की, तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारच्या सूचनेनुसार पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना पैशांची ऑफर दिली आणि मृतदेहावर त्वरीत अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली.
राज्य सरकारच्या निर्देशानंतर कोलकाता पोलिसांनी वडिलांना पैसे देऊ केले आणि आपल्या मुलीच्या मृतदेहावर विनाविलंब अंत्यसंस्कार करावेत, असे सांगितले, असा आरोप चौधरी यांनी केला.
शासकीय आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. आपल्या सहकाऱ्याला न्याय मिळावा आणि वैद्यकीय संस्थांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी कनिष्ठ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
अधीर रंजन चौधरी यांना आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. आरजी कर हॉस्पिटलच्या भेटीदरम्यान आंदोलक डॉक्टरांना भेटण्यापासून रोखल्याबद्दल ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने पोलिसांवर निशाणा साधला.
मी राजकीय नेता म्हणून नव्हे तर एक सामान्य व्यक्ती म्हणून तिथे गेलो होतो, आंदोलक डॉक्टरांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मी गेलो होतो. पण मला पोलिसांनी भेटण्यापासून रोखले. जर त्यांनी ही तत्परता आधी दाखवली असती तर आमच्या भगिनी डॉक्टरचे प्राण वाचले असते.
कोलकाता पोलिसांच्या एका नागरी स्वयंसेवकाला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आता तपास हाती घेतला आहे.