कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारने राज्यभरातील महिलांसाठी नवीन सुरक्षा उपाय योजना सुरू केल्या आहेत. महिला डॉक्टरांसह अन्य महिला कर्मचाऱ्यांनी एकावेळी १२ तासांपेक्षा जास्त ड्युटी करू नये, असे बंधन घातले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने 'रतीर साथी' (Rattirer Shaathi) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, महिला वसतिगृहे आणि तत्सम ठिकाणी रात्रीपोलिस गस्त घालण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
रुग्णालये व संबंधित सुविधांमध्ये सर्व मजल्यांवर पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी ओळखपत्र प्रदर्शित करणे आवश्यक आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी पोलिसांकडून एक सुरक्षा अधिकारी नेमण्यात येणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये व तत्सम संस्थांमधील सुरक्षा रक्षकांमध्ये पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असावा, असे निर्देशही शासनाने दिले आहेत