Hardeep Singh Shot Dead : खालिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hardeep Singh Shot Dead : खालिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या

Hardeep Singh Shot Dead : खालिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या

Published Jun 19, 2023 11:02 AM IST

Hardeep Singh Shot Dead : गुरुद्वारामध्ये आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Hardeep Singh Nijjar Shot Dead
Hardeep Singh Nijjar Shot Dead (HT)

Hardeep Singh Nijjar Shot Dead : खलिस्तानी समर्थक आणि दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कॅनडातील एका गुरुद्वारात अज्ञात आरोपींनी निज्जरला ठार मारलं असून कॅनडा पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं आता पंजाबमधील खलिस्तानवाद्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच खलिस्तान समर्थक गगनदीप याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरदीपसिंग निज्जर हा गेल्या काही महिन्यांपासून भारतातून फरार झाला होता. तो कॅनडात असल्याची माहिती तपास यंत्रणांना होती. परंतु तो सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये प्रार्थना करत असतानाच दोन अज्ञात आरोपींनी गुरुद्वारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट गोळीबार करत हरदीपसिंग निज्जरची हत्या केली. हरदीपसिंग निज्जरच्या पोटावर, मानेवर आणि डोक्यात पाच ते सहा गोळ्या लागल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सरे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर हरदीपसिंग निज्जरचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

हरदीपसिंग निज्जर हा कॅनडातील शीख फॉर जस्टिस या संघटनेचा प्रमुख होता. याशिवाय निज्जर हा खलिस्तानी टायगर फोर्सचाही सूत्रधार होता. कॅनडासह अन्य देशांत बसून हरदीपसिंग निज्जर भारतविरोधी कारवाया करत करत होता. तसेच भारतातील खलिस्तानी आंदोलनाला आर्थिक बळ देण्याचं कामही निज्जर करत होता. त्याची हत्या करण्यात आल्याने खलिस्तानवादी आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर