sunny leone dance performance in kerala : हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावलेली एकेकाळची पॉर्नस्टार सनी लिओनी हिच्या एका कार्यक्रमाला केरळ विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
मल्याळम मीडियानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या कॅम्पसमध्ये ५ जुलै रोजी सनी लिओनी हिचा डान्स शो होणार होता.
केरळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहनन कुन्नम्मल यांनी कुलसचिवांना लिओनीच्या शोचा कार्यक्रम पत्रिकेत समावेश करू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (कुसॅट) इथं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर ६० हून अधिक जण जखमी झाले होते. अशा घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणूनच कुलगुरू कुन्नम्मल यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
४३ वर्षीय सनी लिओनी हिला हिंदीनंतर आता प्रादेशिक भाषांतील चित्रपटाच्याही ऑफर मिळू लागल्या आहेत. ती लवकरच एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. एप्रिल महिन्यात तिनं चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करताना सेटवरील मुहूर्ताच्या सोहळ्याची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. 'या अप्रतिम मल्याळम चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी इतकी उत्सुक आहे की मी माझे हात जाळून घेतले. दिग्दर्शक : @pampally,' असं कॅप्शन तिनं इन्स्टाग्राम पोस्टला दिलं आहे.
सनी लिओनी हिनं आतापर्यंत 'जिस्म २', 'जॅकपॉट', 'शूटआऊट अॅट वडाला' आणि 'रागिनी एमएमएस २' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलीकडंच तिनं कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' या चित्रपटात राहुल भट आणि अभिलाष थपलियाल यांच्यासोबत काम केलं होतं.