Agniveer Updates : निवृत्त सैनिक किंवा अग्निवीर भरती योजने अंतर्गत भरती झालेल्यांसाठी खुश खबरी आहे. सरकार त्यांच्यासाठी खास योजना आणण्याच्या तयारीत आहेत. अग्निवीरांना भविष्यात रोजगार मिळण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, कारण ते कुशल सैनिक म्हणून सैन्यातून बाहेर पडतील. लष्कराने आपल्या सैनिकांना आणि अग्निवीरांना ५०० प्रकारच्या रोजगारक्षम कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी कौशलवीर नावाची नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना नवीन शैक्षणिक धोरण आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (NCF) च्या अनुषंगाने तयार करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या मदतीने ही योजना तयार केली जात आहे. या योजनेंतर्गत, निवृत्त होणारे सैनिक आणि कालावधी संपल्यावर निवृत होणारे अग्निवीर यांचा कौशल्य राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यांना या अंतर्गत आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना राष्ट्रीय कौशल्य पात्रता पातळी ५.५ नुसार प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. यामध्ये उपव्यवस्थापक स्तरावरील जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे.
लष्कराने तयार केलेल्या कौशल्यवीर योजनेच्या ब्लू प्रिंटनुसार सुमारे पाचशे प्रकारची कौशल्ये लष्करातून निवृत्त होणाऱ्यांना दिले जाणार आहेत. हे सैनिक यापैकी एका कौशल्याने प्रशिक्षित असतील. यासाठी देशभरातील ३७ कौशल्य क्षेत्र परिषद आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या १०० प्रशिक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. या प्रकल्पासाठी १७ कौशल्य प्रमाणपत्र देणाऱ्या एजन्सी आणि ४० मूल्यांकन संस्थांची मदत घेण्यात येत आहे.
जरी, ही योजना नियमित सैनिक आणि अग्निवीर दोघांसाठी असली तरी अग्निवीर योजने अंतर्गत भरती झालेल्यांना याचा अधिक लाभ मिळेल कारण ते कमी वयाचे असतील आणि या योजनेत सक्रियपणे सहभागी होतील.
सुरक्षा कर्तव्यांव्यतिरिक्त लष्कराचे जवान इतर प्रकारच्या तांत्रिक कामातही प्रशिक्षित असतात. त्याआधारे पाचशे प्रकारची कामे निश्चित करण्यात आली आहेत. निवृत्तीपूर्वी सैनिकांना त्यानुसार अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण देऊन, त्यांना उद्योगाच्या गरजेनुसार तयार केले जाईल, जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळू शकतील.
सशस्त्र दलातून दरवर्षी ६२ हजार सैनिक निवृत्त होत असतात. त्याचबरोबर दरवर्षी ५० हजार अग्निवीरांची भरती देखील केली जात आहे. २०२६ मध्ये ३८ हजार अग्निवीरांचा सेवा कालावधी पूर्ण होणार आहे.
संबंधित बातम्या