Yana Mir Speech : काश्मीरमधील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती याना मीर या तरुणीचे ब्रिटनच्या संसदेत दिलेले भाषण चांगलेच व्हायरल झाले आहे. यानाने केवळ पाकिस्तानलाच खडेबोल सुनावले नाही तर काश्मीरवरून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचाही पर्दाफाश केला. ब्रिटिश संसदेत याना मीर हिने म्हटले की, मी मलाला यूसुफजाई नाही, कारण मला माझ्या देशातून कधीही पळून जावे लागणार नाही. मी स्वतंत्र आहे. मी माझा देश भारत आणि राज्य जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षित आहे. हा कार्यक्रम जम्मू-काश्मीर स्टडी सेंटर यूके (JKSC) कडूनआयोजित केला गेला होता. याना मीर हिला विविधता राजदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मलालाशी तुलना करताच भडकली याना मीर -
काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ती याना मीर हिची तुलना पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ती मलाला यूसुफजाई हिच्याशी केली होती. यावर याना चांगलीच भडकली. याना मीरने आपल्यात व नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला यूसुफजाई दरम्यानचा फरक जोर देऊन सांगितला. याना मीर म्हणाली की, मला यावर आक्षेप आहे. मी मलाला नाही, जिला दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आपला देश सोडावा लागेल.
यानाने म्हटले की, मी मलाला यूसुफजई नाही, मला कधीही पळून जाऊन तुमच्या देशात शरण घेण्याची गरज पडणार नाही. मलाला द्वारा माझ्या देशाला, माझ्या मातृभूमीला अत्याचारित संबोधून बदनाम करण्याच्या षडयंत्रावर आक्षेप आहे. मला सोशल मीडिया आणि विदेशी मीडियावरील अशा सर्व 'टूलकिट मेंबर्स' वर आक्षेप आहे, ज्यांनी कधीही काश्मीरला येण्याचे कष्ट घेतले नाही, मात्र अत्याचाराच्या कथा लिहिल्या आहेत.
मीरने म्हटले की, धर्माच्या आधारावर भारतीयांना विभक्त करणे बंद करावे. आम्ही आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडू. मला आशा आहे की, ब्रिटन व पाकिस्तानात राहणारे लोक माझ्या देशाला बदनाम करणे थांबवतील.
याना मीर जम्मू-काश्मीर यूथ सोसायटीशी संबंधित आहे. ब्रिटिश संसद भवनात जम्मू-काश्मीर स्टडी सेंटर यूके (जेकेएससी) द्वारा आयोजित संकल्प दिवस कार्यक्रमात तिने भाषण केले. या कार्यक्रमात १०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. याना मीर हिच्या वडिलांचे २६ जानेवारी रोजी निधन झाले होते.