Mallikarjun Kharge On Karnataka Election Results 2023 Live : भाजपसाठी दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रयत्नांच्या बळावर काँग्रेसने तब्बल १३४ जागा जिंकल्या आहे. भाजपला ६४ तर जेडीएसला १९ जागा मिळाल्या आहे. त्यामुळं आता कर्नाटकातील अभूतपूर्व यशामुळं अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. त्यानंतर आता कर्नाटकात विजयाचा करणाऱ्या भाजपवर विरोधकांनी टीकेचे बाण सोडले आहे. त्यातच आता आम्हाला भारतातून संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा भाजपा आता दक्षिण भारतातून संपल्याचं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा काँग्रेसमुक्त भारत करण्याचं आवाहन मतदारांना केलेलं आहे. यावरून नेहमीच भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर आम्हाला काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाल्याचं वक्तव्य करत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी-शहांना जोरदार टोला हाणला आहे. कर्नाटकात आम्ही मोठा विजय मिळवला असून या निकालामुळं देशभरात एक नवी उर्जा निर्माण होणार असल्याचंही खर्गे यांनी सांगितलं.
कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे सर्व विजयी आमदारांना हैदराबादेतील एका हॉटेलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यानंतर उद्या दुपारी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यामुळं आता काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांकडून कुणाच्या नावाला संमती दिली जाते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.