कर्नाटक सरकारच्या बसचे स्पेअर चाक (spare wheel) रस्त्यातच कोसळले. महामार्गावरून भरधाव धावताना बसचे अतिरिक्त असलेले चाक रस्त्यात्याच्या मध्यभागी कोसळले. मागे असलेल्या कार चालकाच्या सतर्कतेमुळे वर्दळीच्या रस्त्यावर मोठा अपघात टळला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका धावत्या सरकारी बसचे सुटे चाक निखळून पडल्याचे दिसत आहे. यामुळे मागे असलेल्या वाहनांना धोका निर्माण झाला होता.
प्रतीक सिंह या युजरने एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. डॅश कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड करण्यात आली असून मागे असलेली कार ताशी ४०-५० किमी वेगाने असल्याचे सांगितले जात आहे. प्रतीकला त्याच्या फॉलोअर्सकडून व्हिडिओ मिळाला ज्यात त्याने लिहिले की, "मी आजच्या घटनेवर (३ जुलै २०२४) माझ्या कार, अल्काझार डॅशकॅमचा एक व्हिडिओ शेअर करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्नाटक सरकारच्या बसचे सुटे टायर (spare wheel) दिसेल, एक बस रस्त्यावरून जाताना सुटे चाक खाली पडते. ज्यामुळे संभाव्य अपघाताची परिस्थिती निर्माण होते. मी बसच्या मागे ४०-५० किमी वेगाने गाडी चालवत होतो, मी प्रसंगावधान राखल्याने रस्त्यात पडलेल्या चाकाला धडकलो नाही. यामुळे अपघात टाळू शकलो.
मागे असलेल्या वाहनांनीही सतर्कता दाखवत रस्त्यावर पडलेल्या चाकाला टाळत गाडी वळवली. त्याने लिहिले आहे की, माझ्या कारच्या मागे येणारी इनोव्हा गाडी जवळजवळ चाकावर आदळली होती. मात्र करकचून ब्रेक दाबल्याने अपघात टळला. मी चाक पडल्याचे सांगण्यासाठी बसचा पाठलाग करत होता. पाठिमागून हॉर्न वाजवत होतो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर बस थांबवून चालकाला सुटे टायर रस्त्यावर पडल्याचे सांगितले. असे प्रतीकने त्याच्या एक्स पोस्टवर म्हटले आहे.
दरम्यान, केएसआरटीसीने या घटनेची कबुली दिली असून कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, ब्रेक मारताना दोन वाहनांमध्ये योग्य अंतर राखले पाहिजे. तसे न केल्यास अचानाक ब्रेक मारल्यास गाडी भिंतीवर किंवा उभ्या ट्रकच्या मागच्या बाजूस आदळून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थांबण्यासाठी पुरेशी जागा सोडा.
संबंधित बातम्या