Karnataka Shocking News: कर्नाटकातील एका सरकारी रुग्णालयातील परिचारिकाने सात वर्षांच्या मुलाच्या गालावरील खोल जखमेवर उपचार करताना टाके घालण्याऐवजी फेविक्विक लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार मुलाच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी व्हिडिओ काढून रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील सुरक्षिततेच्या मानकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी संबंधित परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, १४ जानेवारी २०२५ रोजी गुरुकिशन अन्नाप्पा होसमणी याच्या चेहऱ्यावर खोल जखम झाल्याने त्याच्या पालकांनी त्याला हावेरी जिल्ह्यातील हनगल तालुक्यातील अदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, ज्योती नावाच्या परिचारिकाने त्याच्या जखमेवर टाके घालण्यास कायमस्वरुपी डाग पडू शकतो म्हणून फेविक्विक हा एक चांगला पर्याय असल्याचा तिने दावा केला.
परिचारिकेच्या नैमित्तिक वागणुकीमुळे घाबरलेल्या मुलाच्या पालकांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यात तिने आत्मविश्वासाने आपल्या कृतीचे समर्थन केले आणि ती वर्षानुवर्षे अशा प्रकारचे उपचार करत असल्याचे ठामपणे सांगितले. या घटनेने व्यथित झालेल्या पालकांनी पुरावा म्हणून फुटेज सादर करत औपचारिक तक्रार दाखल केली.
वैद्यकीय नियमांचे स्पष्ट उल्लंघन होत असतानाही प्रशासनाने सुरुवातीला कडक कारवाई करण्याऐवजी ज्योतीला ३ फेब्रुवारी रोजी हावेरी तालुक्यातील गुथल आरोग्य संस्थेत हलवले. या सौम्य प्रतिसादामुळे जनक्षोभ आणखी वाढला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आरोग्य विभागाने प्राथमिक अहवालाचा आढावा घेऊन परिचारिकेला निलंबित केले. आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निवेदनात फेविक्विकला वैद्यकीय वापरासाठी मान्यता देण्यात आलेली नाही आणि परिचारिकांची कृती गंभीर निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट करत निलंबनाला दुजोरा दिला आहे.
सुदैवाने मुलाचे तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. अयोग्य उपचारांमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य गुंतागुंतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या