कर्नाटकातील हुबळी येथे अतुल सुभाष आत्महत्येसारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून चामुंडेश्वरी नगरमध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यावर लिहिले आहे, 'बाबा, मला माफ करा, तिला (पत्नीला) माझा मृत्यू हवा आहे.' कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करत शवपेटीवर त्याच्या आत्महत्येचे कारणही लिहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीटर सॅम्युअल (वय ४०) हा हुबळीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. त्यावर लिहिलं होतं, "मला माफ करा बाबा. पिंकी मला मारत आहे. तिला माझा मृत्यू हवा आहे. यानंतर त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
पीटरची पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे दुसऱ्या एका पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची कुणकुण पीटरला लागल्यानंतर त्याने याबाबत पत्नीकडे विचारणा केली. यावर तिने म्हटले होते हे माझं आयुष्य आहे, माझ्या मर्जीनुसार जगणार. पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू असून हे दाम्पत्य विभक्त राहत होते. काही दिवसापूर्वी पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार होती. पत्नीने वकिलामार्फत २० लाख रुपयांची मागणी केली होती. या घटनांमुळे नैराश्येत गेलेल्या पीटरने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पीटरच्या कुटुंबियांनी शवपेटीवर पीटरच्या आत्महत्येचे कारणही लिहिले आहे. पीटरने आत्महत्येपूर्वी शेवटची इच्छा सांगितली होती. ज्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या शवपेटीवर "माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला आहे" असे लिहिले. या दाम्पत्याला दोन मुलेही आहेत. या प्रकरणी अशोकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.
गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अतुल सुभाष (वय ३४) यांचा मृतदेह बंगळुरूतील मुन्नेकोलालू येथील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने पत्नी आणि सासू-सासऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्या अस्थि न्यायालयाच्या समोरील गटारात विसर्जित करा. या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. या प्रकरणाची सुनावणी झाली असून अतूल सुभाष यांच्या मुलाचा ताबा न्यायालयाने त्याच्या पत्नीकडे दिला आहे.
संबंधित बातम्या