Cow Smuggling : देशातील अनेक राज्यात गो-तस्करीच्या घटना समोर येत आहेत. याविरोधात स्थानिक प्रशासन कडक कारवाई करते. मात्र गो तस्करी सुरुच असल्याचे दिसून येते. आता याविरोधात कर्नाटक सरकार एक्शन मोडवर आले आहे. उत्तर कन्नड़ जिल्ह्यातील गाय चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री मंकल एस वैद्य य़ांनी इशारा दिला की, अशा घटनांत सामील लोकांना रस्त्यात व भरचौकात गोळ्या घातल्या जातील.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गो वंश चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रभारी मंत्री मंकल वैद्य यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, गो तस्करीत गुंतलेल्या व्यक्तींना रस्त्यावर किंवा चौकांमध्ये उघडपणे गोळ्या घातल्या जातील. वैद्य यांनी जिल्ह्यात असे प्रकार सुरू राहू देणार नसल्याचे सांगितले. गाई व गोपालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. होन्नावरजवळ नुकत्याच झालेल्या गरोदर गायीच्या कत्तलीच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर वैद्य यांनी हे वक्तव्य केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गाय चोरीच्या घटना घडत आहेत. मी एसपींना सांगितले की हे थांबले पाहिजे आणि हे कोणत्याही किंमतीवर होऊ नये. हे चुकीचे आहे. आम्ही गायींची पूजा करतो. या प्राण्याला आपण प्रेमाने सांभाळतो. त्याचं दूध पिऊन आम्ही मोठे झालो. या गुन्ह्यात जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश पोलिसांना दिल्याचे वैद्य यांनी पत्रकारांना सांगितले. काही प्रकरणांमध्ये अटकही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अशा घटना सुरूच राहिल्या तर कदाचित मी हे बोलू नये, पण आरोपींना रस्त्यावर किंवा चौकात गोळ्या घातल्या जातील याची मी काळजी घेईन. काम करा, कमवा आणि खा. आमच्या जिल्ह्यात रोजगाराचे अनेक पर्याय आहेत. पण गो तस्करी करणाऱ्यांना आम्ही कोणत्याही किंमतीवर पाठिंबा देणार नाही. मंत्री म्हणाले की, यापूर्वीही भाजप सत्तेत असताना अशा घटना घडल्या होत्या. या मुद्द्यावरून सरकारला घेरणाऱ्या विरोधी पक्षावर मंत्र्यांनी निशाणा साधला. सत्तेत असताना त्यांनी या विषयावर मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला.
संबंधित बातम्या